कोरोना संक्रमण रोखण्यात आणि लसीकरणाच्या इत्यंभूत माहितीसाठी आरोग्य सेतू अँपची मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे. त्याचप्रमाणे, सर्वांना लस, मोफत लस अभियानाअंतर्गत, भारतात आज एकूण ९० कोटी एवढ्या विक्रमी संख्येने लसींच्या मात्रा देण्यात आल्या असून, यामध्ये Co-WIN पोर्टलची भूमिकाही निश्चितच अतिशय महत्वाची आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘आयुष्मान भारत-डिजिटल अभियाना’चा शुभारंभ करण्यात आला. आयुष्मान भारत-डिजिटल अभियानामुळे देशभरातील रुग्णालये, डिजिटली एकमेकांना जोडण्यास मदत होईल, असे पंतप्रधान मोदीनी सांगितले.
या अद्ययावत अभियानामुळे, रुग्णालयातील सर्व प्रक्रिया तर सहज शक्य होतील, त्याशिवाय, जीवनमान सुद्धा सुधारण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. या अंतर्गत, देशातील प्रत्येक नागरिकाला एक डिजिटल आरोग्य कार्ड मिळणार असून त्यांची सर्व आरोग्यविषयक माहिती, डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवता येणे शक्य होणार आहे. या डिजिटल सुविधा, रेशनपासून ते प्रशासनापर्यंत जलद, पारदर्शक पद्धतीने सर्व लाभ आणि सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, गेल्या सात वर्षांमध्ये, देशातल्या आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी सरकारने अनेक अभियान सुरु केले आहेत, ते अभियान आज एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. “आज सुरु करत असलेल्या या अभियानामध्ये, भारतातील सर्व आरोग्य सुविधांमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता आहे”, असं पंतप्रधान म्हणाले.
“११८ कोटी मोबाईल ग्राहक, १३० कोटी आधार क्रमांक, सुमारे ८० कोटी इंटरनेट वापरकर्ते, सुमारे ४३ कोटी जनधन बँक खाती इतक्या विस्तारित प्रमाणावर परस्परांशी जोडलेल्या पायाभूत सुविधा या जगात कुठेच नाहीत,” असे मोदींनी यावेळी विशेष करून सांगितले.