पोलिस प्रशासनाच्या ‘नेत्रा’ उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत बँका, सरकारी व खासगी कार्यालय परिसरात ६० ठिकाणी १७० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तरीही शहरातील चोरी अन् घरफोडीच्या घटना वाढलेल्या आहेत. त्यामुळे सीसीटीव्हीचा वॉच अपुरा ठरत आहे. त्यामुळे राजापूर तालुक्याच्या सुरक्षिततेचे कवच अधिक मजबूत करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग, रत्नागिरी-सिंधुदुर्ग सांगरी महामार्ग, घाटमार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार आदी मोक्याच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी ‘तिसरा डोळा’ म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे बसवण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. सुरक्षितता आणि चोऱ्यांना आळा घालणे, अवैध धंद्यांना पायबंद घालणे यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पोलिस प्रशासनाने नेत्रा उपक्रम राबवला आहे.
त्या अंतर्गत पोलिस प्रशासनाने सरकारी आणि खासगी कार्यालये, बँका यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन केले होते. त्याला सरकारी, खासगी कार्यालये, बँका यांच्याकडून प्रतिसादही मिळाला. तालुक्यात १७० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत; मात्र गेल्या काही महिन्यात तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. अवैध धंद्यांना पायबंद घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्य संख्येत वाढ होणे गरजेचे आहे. सद्यःस्थितीत महामार्ग वा अन्य ठिकाणी बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांमध्ये पोलिस तपासाच्यादृष्टीने अधिक सुस्पष्टता नाही. त्यामुळे विशेषतः सार्वजनिक आणि वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास त्याचा त्याला अधिक फायदा होणार आहे.