मुंबई महानगरीला मानवी बॉम्बचे स्फोट घडवून उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी २४ तासात नोएडा, नवी दिल्ली येथून हातकड्या घालून जेरबंद केले. मुंबईत ३४ वाहनांमध्ये सुमारे ४०० किलो आरडीएक्स हे घातक स्फोटक ‘पेरण्यात’ आले असून ऐन गणेशोत्सवात त्याचा धमाका उडेल आणि मुंबईतील सुमारे १ कोटी लोकांना त्याचा जबर फटका बसेल अशी भयावह धमकी त्या इसमाने दिली होती. त्याने गुरुवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांना व्हॉटसअपवर ही धमकी दिली आणि मग पोलिस व प्रशासनाची जबरदस्त धावपळ उडाली. रातोरात सर्वत्र कडेबोट बंदोबस्त खडा करण्यात आला. मुंबईत तर नाकेबंदी करुन बारकाईने तपासणी सुरु झाली.. मात्र मुंबई पोलिसांनी यावेळीही चातुर्याने २४ तासाच्या आत आरोपीला जेरबंद केले.. त्याला दिल्ली नोएडा येथून विलक्षण चपळाईने ताब्यात घेण्यात आले! मुंबईत ४०० किलो आरडीएक्स ही घातक स्फोटके ३४ वाहनांमध्ये ‘पेरण्यात’ आली असल्याची गुरुवारी रात्री धमकी येताच मुंबईचे पोलिस खाते हडबडून गेले.
२४ तासात आरोपी जेरबंद ! – मात्र मुंबईचे पोलिस हे जगविख्यात स्कॉटलंड यार्डच्या तोडीचे पोलिस खाते म्हणून साऱ्या जगात ओळखले जाते. धमकी मिळताच २४ तासात त्यांनी छडा लावला आणि धमकी देणाऱ्या आरोपीच्या मुसक्या थेट नोएडा दिल्ली येथे जाऊन रातोरात आवळल्या. या आरोपीचे नाव अश्विनकुमार सुप्रा असे असून तो सुमारे ५० वर्षे वयाचा आहे. बिहार मधील पाटणा येथील तो मूळचा रहिवासी व गेल्या ५ वर्षांपासून तो नोएडा, दिल्लीमध्ये राहतो, त्याचा म्हणे ज्योतिष व वास्तुशास्त्राचा दांडगा अभ्यास आहे.
मुंबईत हाय अॅलर्ट! – त्याने गुरु. दि. ४ सप्टेंबर रात्रौ उशिरा व्हॉटसअपवर मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश पाठविला. ‘लष्कर-ए-जिहादी’चे चौदा दहशतवादी मुंबईत घुसले असून त्यांनी ३४ वाहनांमध्ये ४०० किलो आरडीएक्स बसविले आहे. ते मोठा स्फोट करणार असून ज्यामध्ये १ कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो असे त्याने धमकीच्या संदेशात नमूद केले होते. धमकीचा संदेश मिळताच मुंबई पोलिसांनी हाय अॅलर्ट जारी केला, मुंबई शहर व परिसराची चौफेर नाकेबंदी केली, जागोजागी कडक तपासणी सुरु झाली.. एवढेच नव्हे तर संपूर्ण कोकणात रत्नागिरी पासून सर्वत्र एसआरपींचा खडा पहारा सुरु झाला.
हुशारीने माग काढला! – याचा तपास पोलिसांच्या गुन्हा शाखेकडे सोपवण्यात आला. दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) व इतर सुरक्षा एजन्सी देखील सतर्क झाल्या. मुंबई पोलिसांनी अतिशय हुशारीने माग काढला आणि मुंबई पोलिस अधिकारी दिल्ली, नोएडा येथे जाऊन पोहोचले. नोएडा सेक्टर ७९ मधील एका सोसायटी मधून मुंबई पोलिसांनी आरोपीला तडका फडकी जेरबंद केले. पोलिसांनी त्याचा मोबाईल व सीमकार्ड जप्त कले आहे. त्याखेरीज त्याच्याकडून ४ सीमकाड होल्डर्स, ६ मेमरी कार्ड होल्डर्स, १ सीम स्लॉट एक्स्टर्नल, २ डिजीटल कार्ड जप्त करण्यात आली.
फिरोजच्या नावाने धमकी ! – आरोपीला आता नोएडा येथून मुंबईत आणण्यात आले आहे. आरोपी २०२३ मध्ये एका फसवणुकीच्या प्रकरणात ३ महिने पाटणा तुरुंगात होता. त्यानंतर फिरोज नावाच्या व्यक्तीने त्याच्याविरुध्द तक्रार केली होती. तेव्हापासून त्याला फिरोजचा बदला घ्यायचा होता म्हणून त्याने फिरोजच्या नावाने मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश पाठविला. मात्र तो फिरोज कोण आहे व नेमके फसवणूकीचे प्रकरण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी झटपट चतुर्भुज केल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.