चिपळुणातील उमेदवारांच्या प्रचारासाठी सिनेकलाकारांनी राजकीय झेंडे हातात घेतले आहेत. प्रचारात गर्दी जमवण्यासाठी सिनेकलाकारांचा वापर होत आहे. एरवी टीव्ही स्क्रीनवर, सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर किंवा मोबाइलच्या रीलमध्ये झळकणारे सिनेकलाकार सध्या राजकीय आखाड्यात उतरल्यामुळे (फॅन्स्) चाहत्यांचा कल कुणाकडे राहणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी विविध पक्षांनी कलाकारांच्या ग्लॅमरचा आधार घेतला आहे. त्यांच्या उपस्थितीने प्रचारसभांचे आकर्षण दुपटीने वाढले आहे. निवडणुकीच्या प्रचारवारीत कोणी प्रत्यक्ष ‘झेंडा’ हाती घेतला आहे, तर कोणी केवळ सोशल मीडियावर आवडत्या नेत्याला आणि पक्षाला ‘लाइक अँड शेअर’ करत आहे. स्थानिक कलाकार मात्र निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारापासून लांब आहेत. लोकसभा निवडणुकीत प्रचारात सहभागी होण्यासाठी मराठी कलाकारांनी मानधनही घेतले.
आताही अनेक कलाकारांनी लाखोंचे मानधन घेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात रंगत आणली आहे. नीलेश राणे यांनी २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवला होती. त्या वेळी त्यांच्या प्रचारासाठी हिंदी चित्रपट सृष्टीतील सलमान खाना हिंदी कलाकारांनी चिपळुणात रोडशो केला. त्यानंतरच्या निवडणुकीत उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी कलाकार आले नाहीत. या वेळी चिपळूण विधानसभा मतदार संघाची लढत चुरशीची होत आहे. त्यामुळे कलाकारांचा आधार घेतला जात आहे. लोकांना खळखळून हसवणारा कॉमेडी किंग भाऊ कदम हसवणार पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत. त्यांनी चिपळूण स्टार प्रचारकख येथे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला. उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचे उद्घाटन आणि कॉर्नर सभा त्यांच्या उपस्थितीत झाल्या.
सयाजी शिंदे यांनी महायुतीच्या उमेदवारासाठी चिपळुणात प्रचार सभा घेतली. ‘लोकसभेला जे वारे होते तेच वारे आताही आहेत’, असे म्हणत अभिनेता खासदार अमोल कोल्हे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा सोशल मीडियावरून प्रचार सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांची चिपळूणला सभा झाली. त्या वेळी अमोल कोल्हे चिपळूणला येणार असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र त्यांचा दौरा अचानक रद्द झाला; मात्र सोशल मीडियावरून त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केला आहे.