रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता वाहू लागले आहेत. यावेळी शिवसेना शिंदे गटाला एक हाती सत्तेवर येण्यासाठी अनेक राजकीय डावपेच आखावे लागणार आहेत, त्यामुळे शिंदे गटाला सहज सत्ता मिळेल अशी शक्यता फार कमी आहे. त्यामुळे युती असेल तर भाजपाला जागा सोडाव्या लागतील तर मग ते लाभदायी ठरेल. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकी नंतर शहराचे राजकिय चित्र स्पष्ट आहे. आमदार आणि मंत्री उदय सामंत यांनी विकास कामे मोठ्या प्रमाणात केली आहेेत. विकासाच्या प्रक्रियेत शहराला पुढे आणले आहे, हे निर्विवाद सत्य आहे. तरिही नगर परिषदेच्या निवडणूकीमध्ये प्रश्न भिन्न आहेत. इथे उमेदवार निवडीवर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. माजी नगरसेवक यांचे विषयी तितकेसे चांगलेमत सर्व ठिकाणी आहेच असे नव्हे, याला पण अपवाद आहेत, त्यामुळे काही ठिकाणी नवे चेहरे द्यावे लागतील. मतांची विभागणी करण्यासाठी आत्तापासुन मतांचे आराखडे तयार केले जात आहेत.
प्रभागात असलेल्या मतदारांची संख्या आणि उमेदवार यांचे गणित आत्तापासूनच तयार केले जात आहे, तेथील स्थानिक प्रश्नांवर गाठीभेटी वाढल्या आहेत. रत्नागिरी शहरात मिरकरवाडा, राजिवडा, कोंकण नगर, आरोग्य मंदीर हा परिसर यावेळी युतीला पोषक ठरेल असे नाही. गेल्या निवडणूकीत एकत्र असलेल्या शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक याच मतदारसंघातून निवडून आले. नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी या भागतील मतदार संघातील निम्मे सभासद महत्वाची भूमिका बजावतात. नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार कोण? याचीही चाचपणी केली जात आहे. वरील मतदार संघात आजचे चित्र वेगळे आहे. मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे, ही नाराजी दूर करावी लागेल. उमेदवार निवड प्रक्रियेत स्थानिक मतदारांचा विचार आतापासून घ्यावा लागणार आहे. शहरात शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार, भारतीय जनता पार्टी, कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहूजन समाज पक्ष, आमआदमी पार्टी या पक्षांचे उमेदवार निवडणूकीत दिसणार आहेत.
गेल्या ५ वर्षात शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षाची ताकद वाढली आहे हे निर्विवाद सत्य नाकारुन चालणार नाही. शिवसेना ठाकरे, राष्ट्रवादी पवार, कॉंग्रेस पक्षाची आघाडी एक पॉवर म्हणून या निवडणूकीत समोर येवू शकते त्यादृष्टीने काही बैठका झाल्याचे समजते. महायुती जर एकत्र असेल तर, रत्नागिरी नगरपरिषदेची निवडणूक विरोधकांना डोईजड होईल, यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना महत्वाची राजकिय भूमिका पार पाडेल. शिवसेना ठाकरे व मनसे एकत्र आले तर निवडणूकीला रंग चढेल,असे राजकिय समिक्षकांचे मत आहे.