भाजपचे युवा नेते आणि राज्याचे मत्स्योद्योग मंत्री ना. नितेश राणे यांच्या कौतुकाचे लावलेले बॅनर काढण्यात आल्याने संतापलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा त्याच ठिकाणी बॅनर लावले आहेत. एकच बॅनर काढण्यात आला होता. मात्र त्यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी शुक्रवारी त्याच ठिकाणी एक नव्हे तर २ बॅनर लावले आहेत. या बॅनरवरून रत्नागिरीत राजकारण चांगलेच तापले आहे. रत्नागिरीतील मिरकरवाडा परिसरातील अतिक्रमणे तोडण्याचे आदेश देणारे भाजपचे नेते आणि राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या कौतुकाचे लावलेले बॅनर कुणीतरी काढल्याने गुरूवारी रात्री भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली होती. ५० ते ६० कार्यकर्ते भाजपचे रत्नागिरी शहर अध्यक्ष राजन फाळके यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यकर्ते रातोरात पोलीस स्थानकात पोहोचले होते. बॅनर कोणी काढले याचा शोध घ्या आणि दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी करणारे एक निवेदन या कार्यकर्त्यांनी पोलीसांना दिले.
कौतुकाचे बॅनर – रत्नागिरी मिरकरवाडा बंदर नजीक मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे तसेच अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. मागच्या आठवड्यात रत्नागिरी दौऱ्यावर आलेले राज्याचे मत्स्य व्यवसाय खात्याचे मंत्री नितेश राणे यांनी तातडीने सर्व अनधिकृत बांधकाम तोडून टाकण्याचे आदेश बजावले होते. त्यानुसार कारवाईही सुरु झाली. सर्व विरोध मोडून ही कारवाई करण्यात आली. ना. नितेश राणे यांच्या बेधडक कारवाईचे कौतुक करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी रत्नागिरीत दोन ठिकाणी बॅनर लावून त्यांचे अभिनंदन केले.
पोलीसांचे आश्वासन – गुरूवारी सायंकाळी यापैकी एका बॅनर काढण्यात आला. या प्रकाराने भाजपचे कार्यकर्ते संतप्त झाले. सुमारे ५० ते ६० कार्यकर्ते शहर पोलीस ठाण्यावर जावून धडकले. ज्याने कोणी हे कृत्य केले आहे त्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी करत या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. याम ध्ये भाजपचे रत्नागिरी शहर अध्यक्ष राजन फाळके, सतेज नलावडे, महिला आघाडीच्या सौ. वर्षा ढेकणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन पोलीसांनी दिल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री रत्नागिरी शहर पोलीस स्थानकासमोर मांडलेला ठिय्या मागे घेतला.
आज पुन्हा बॅनर लावले – दरम्यान गुरूवारी रात्रीच्या आंदोलनानंतर शुक्रवारी मिरकरवाडा बंदर मार्गावरील ज्या आईस फॅक्टरीसमोर लावलेला बॅनर हटविण्यात आला होता, तेथे जात एकाच्या ऐवजी २ बॅनर लावले आहेत. बॅनर कोणी हटवला याचा शोध पोलीसांनी घ्यावा अन्यथा उग्र आंदोलन करू असा इशारा भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.