चिपळूण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वहाळ येथील कनिष्ठ सहायक लिपिक संशयित दुष्यंत शहाजी तिरमारे याने पगार बिलातून १ कोटी ६३ लाख ६९ हजार ६२७ रुपयाचा शासनाला गंडा घातला. त्याच्याकडून २०२० पासून पगारबिलात खोटी माहिती देऊन पैसे हडपण्याचा प्रकार सुरू होता. तिरमारे याने दोन वर्षात जमवलेल्या पावणेदोन कोटीच्या मायेतून काही सदनिका खरेदी केल्याची आरोग्य विभागात माहिती आहे.
त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्या नंतर मागील दीड-दोन महिन्यापासून तो फरारच होता. पोलीस शोध घेऊन देखील त्याचा शोध लागत नव्हता. अखेर बुधवारी खेर्डी येथून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि अटक केली. त्याला १२ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिरमारे यांनी सेवार्थ प्रणालीत असलेल्या त्रुटींचा अंदाज घेऊन पगारबिलात पावणेदोन कोटीची रक्कम बेकायदा आपल्या बँकखात्यामध्ये वळवली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्वरित त्याची सर्व बॅंक खाती गोठवण्यात आलीत.
पोलिसांनी सांगितले, की संशयित तिरमारे यांनी चतुराईने पगार बिलातून शासनाला पावणे दोन कोटीचा गंडा घातला आहे. त्याच्या कडून मागील दोन वर्षापासून हा फसवणुकीचा प्रकार सुरू आहे. महिन्याकाठी सरासरी १० लाखाची रक्कम तो पगार बिलातून बाजूला काढत होता. नियमित पगारापोटीची रक्कम अदा होत असतानाही ती कमी पडल्याने चौकशीला जेंव्हा सुरवात झाली तेंव्हा हि पैशाची अफरातफर आणि लिपिक तिरमारेचे कांड समोर आले.
त्याने अपहार केल्याने येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती सदानंद जाधव यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला; मात्र अद्याप त्याला अटक झाली नव्हती. तिरमारे याने पगारबिलातून हडप केलेली रक्कम स्वतःच्या बॅंक खात्यात जमा करून घेतली होती. या रक्कमेची त्या-त्या महिन्यात विल्हेवाट लावली. मुळात लिपिकाने सादर केलेली पगारबिले वरिष्ठांनी मंजूर केल्यानंतर पुढे पाठवायची असतात. तिरमारेने सादर केलेल्या बिलांची परिपूर्ण तपासणी न करताच त्यावर वरिष्ठांनी सह्या केल्याचे जिल्हा परिषदेच्या निदर्शनास आले असल्याने अनेक अधिकाऱ्यांचे देखील धाबे दणाणले आहेत.