राजापूरमधील रिफायनरी प्रकल्पा संदर्भात झालेल्या राजापूरचे नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पालिकेच्या बैठकीत रत्नागिरीमध्ये रिफायनरी प्रकल्पाची आवश्यकता असून प्रकल्प उभारणीचे समर्थन करणारा ठराव मंगळवारी संमत झाला. या बैठकीमध्ये ११ विरुद्ध ५ या मतांनी हा ठराव मंजूर करण्यात आला. राजापूर शहर आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासह भविष्यात दर्जेदार आरोग्य सेवा, शैक्षणिक सुविधा सामाजिक आणि आर्थिक विकास, रोजगार निर्मितीसाठी ग्रीन रिफायनरीसारख्या प्रकल्पाची आवश्यकता असल्याचे नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी सांगितले.
रिफायनरी प्रकल्प उभारणी ठरावाच्या वेळी विरोधी भूमिकेत असलेल्या शिवसेनेच्या दोन नगरसेविकांनी प्रतीक्षा खडपे आणि मनीषा मराठे यांनी प्रकल्प उभारणी समर्थनाच्या बाजूने मत नोंदविल्याने त्यातील शिवसेनेच्या नगरसेविका प्रतीक्षा खडपे यांच्यावर प्रकल्पला समर्थन दिल्याबद्दल त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे.
स्वत: प्रतीक्षा खडपे यांनी आपली भूमिका मांडली आहे. रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणारी भूमिका आपल्यासह सहकारी मनीषा मराठे यांनी सुद्धा मांडली आहे, पण त्यांच्या भूमिकेला फक्त तोंडी सूचना देण्यात आल्या आणि आपली भूमिका पक्षविरोधी ठरवली जाऊन हकालपट्टीची कारवाई करण्यात आली, हि अशी दुटप्पी भूमिका का घेतली जात आहे, असा सरळ प्रश्न प्रतीक्षा खडपे यांनी केला आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या अनेक ग्रामपंचायतीनी सुद्धा या रिफायनरी प्रकल्प उभारणी ठरावाला सहमती दर्शवली आहे, मग त्या सर्वांची सुद्धा पक्षाकडून हकालपट्टी करण्यात येईल का? अशा किती समर्थकांची पक्ष हकालपट्टी करणार?
एका बाजूला स्वत: प्रकल्प समर्थनाची बाजू घ्यायची आणि आम्ही समर्थन दर्शविले तर आमच्यावर कारवाई करायची ! हि दुटप्पी भूमिका आम. राजन साळवी का घेत आहेत? अशी आमच्या बाळासाहेबांची शिवसेना नव्हती. असे स्पष्ट मत खडपे यांनी मांडले आहे.