कार्तिकी एकादशीसाठी येथील प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिर सज्ज झाले आहे. यंदा कार्तिकीला आषाढीप्रमाणे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळी स्थितीमुळे सरीवर सरी बरसत आहेत. येथील प्रसिद्ध यात्रेसाठी विविध वस्तू विक्रीसाठी मुंबई व परराज्यातून शेकडो विक्रेते रत्नागिरीत दाखल झाले आहेत; परंतु पावसामुळे त्यांना जागा मिळवून बसणे कठीण झाले आहे. तरीही विक्रेते आणि भाविकांचा उत्साह उद्या पाहायला मिळेल. यात्रेसाठी सर्वत्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रतिपंढरपूर म्हणून येथील विठ्ठल मंदिर सुप्रसिद्ध आहे. आषाढी यात्रेवेळी कोकणातील शेतकऱ्यांना पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला जाणे शक्य नसल्याने येथे मंदिर उभारण्यात आले. पंढरपूरचे सर्व नित्योपचार या मंदिरात केले जातात. कार्तिकी यात्रेला भरपूर गर्दी होते; परंतु यंदा कार्तिकी यात्रेवर पावसाचे सावट आहे. जत्रेनिमित्त रामआळी, गोखलेनाका, गाडीतळ, विठ्ठल मंदिर परिसर, पऱ्याची आळी, मारुती आळी, काँग्रेस भवन या परिसरात जवळपास दीड ते दोन हजार विक्रेते बसतात. या कालावधीत लोकांची गर्दी होते.
विक्रेत्यांनी शोभेच्या वस्तू, लहान मुलांची हरत-हेची खेळणी, कपडे, फळे, फुले, गॉगल्स, रांगोळ्या, स्वयंपाकगृहातील विविध भांडी, विद्युत रोषणाईसाठी माळा, फटाके, काचसामान, घर सजावटीचे साहित्य विक्रीसाठी आणले आहे. यंदा पावसामुळे या विक्रेत्यांची कसोटी लागणार आहे. सकाळी मंदिरात परटवणे येथील दाजिबा नाचणकर संस्थापित पायी दिंडी विठ्ठल मंदिरात पोहोचेल. त्या वेळी भाविकांची भरपूर गर्दी पाहायला मिळेल. दिवसभर भजनांनी मंदिराचा परिसर विठ्ठलमय होणार आहे. रात्री १२ वा. विठुरायाच्या सजवलेल्या रथाची मिरवणूक बाजारपेठेतून ठरलेल्या मार्गावरून काढण्यात येणार आहे.
हेळेकर दांपत्याला पूजेचा मान – एकादशीनिमित्त मध्यरात्री विठुराया व रुक्मिणीच्या प्रथम पूजेचा मान माधवी व गौरव हेळेकर या दांपत्याला मिळणार आहे. त्यानंतर सकाळी ८ वाजल्यापासून विविध मंडळांची भजने सादर होणार आहेत. यात काकडे आरती, प्रवीण सावंत (खेडशी) यांचे कीर्तन, श्री गणेश प्रा. भजन मंडळ (पेठकिल्ला), श्री गगनगिरी भजन मंडळ, जय भवानी भजन मंडळ, श्री नवलाई पावणाई भजन मंडळ, श्री साईनाथ भजन मंडळ, उत्कर्ष भजन मंडळ, प्रसाद कदम, गोवेकर बुवा भजन मंडळ (कुर्ली), स्वामिनी भजन मंडळ, श्री महालक्ष्मी प्रा. भजन मंडळ (कोतवडे), श्री जय हनुमान भजन मंडळ (कर्ले), श्रीदत्त प्रासादिक भजन मंडळ (पूर्णगड) यांची भजने होणार आहेत.
वाहतूक मार्गात बदल – कार्तिकी एकादशीनिमित्त रविवारी (ता. २) व ३ नोव्हेंबरला सकाळी १० वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची रामनाका ते गाडीतळ आणि गोखलेनाका ते काँग्रेसभवन येथील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या वाहतुकीला आठवडा बाजार, टिळक आळी, शेरेनाका, गाडीतळ हा पर्यायी मार्ग वापरावा, असे निर्देश पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिले आहेत.

