रत्नागिरी एमआयडीसी परिसरात प्रतिबंधित असलेल्या व्हेल माशाची उलटी बेकायदेशीररित्या विक्रीसाठी बाळगणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. जप्त केलेल्या व्हेल उलटीची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे ३ कोटी रुपये असून, पोलिसांनी एकूण ३ कोटी १० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक ३० ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास एमआयडीसी रत्नागिरी परिसरातील टीआरपी ते एमआयडीसी रोडवर, बाफना मोटर्स कंपनीच्या पुढील बाजूस मुख्य रस्त्याच्या कडेला हा छापा टाकण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी गणेश राजेंद्र सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी कोणतीही परवानगी न घेता, विनापरवाना व्हेल माशाची उलटी विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यात बाळगून होते. पोलिसांनी आरोपींकडून ३ किलो ४ ग्रॅम वजनाची तीन कोटी किमतीची व्हेल माशाची उलटी सफेद काळपट रंगाची, प्लास्टिक पिशवीसह जप्त केली.
तसेच २ मोटार सायकल. चारचाकी गाडी सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार ताब्यात घेतल्या. टोळीतील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये आसिफ अस्लम मोरस्कर (वय-३८ वर्ष, रा. पिंपळी बुद्रुक नुराणी मोहल्ला ता. चिपळुण जि. रत्नागिरी), रोहीत रमेश चव्हाण (वय-३१ वर्ष, रा. आंबेशेत कुरटेवाडी ता. जि. रत्नागिरी) आणि तेजस पर्शुराम कांबळे (वय-३२ वर्ष, मुळ रा. चिपळुण आडरे मधलीवाडी, सध्या रा. अमनतारा अपार्टमेंट रूम नं. १०४, रत्नागिरी) तिन्ही आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा व इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा करत आहे.

