चिपळूण पालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाकडून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना निवडणुकीच्यादृष्टीने कालबद्ध कार्यक्रम देण्यात आला आहे. त्यानुसार ११ जून ते १ सप्टेंबर या कालावधीत नऊ टप्प्यात हे नियोजन राबवण्याच्या सूचना पालिकेला एका परिपत्रकाद्वारे प्राप्त झाल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे नुकतेच संकेत देण्यात आले. त्यानुसार आता संबंधित संस्थांना निवडणुकीपूर्वी आवश्यक असलेल्या नियोजनाची तयारी करण्याचे सूचनापत्र देण्यात आले आहे. त्यामध्ये ९ टप्प्यांत हा कालबद्ध कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ११ जून ते १ सप्टेंबरपर्यंत होणाऱ्या टप्प्यात सुरुवातीला प्रगणक गटाची मांडणी करण्याचे सुचवले आहे. त्यानुसार चिपळूण पालिकेत प्रगणक गटाची मांडणी करण्याच्या नियोजनांतर्गत २०११ ला झालेल्या जनगणनेचा आधार घेतला जाईल.
त्यानुसार प्रभाग हद्द न फोडता कमी-जास्त लोकसंख्येच्या आधारे जास्तीत जास्त लोकसंख्या असलेले ४ गट, तर कमीत कमी लोकसंख्या असलेले ३ असे ११६ गट वरील जनगणनेनुसार, संपूर्ण प्रभागात करण्यात आले आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीदरम्यान शहरातील वाढलेला मतदारांचा टक्का व १ जूनपर्यंत वाढलेली मतदारसंख्या ग्राह्य धरली जाणार आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, झालेल्या सव्र्व्हेमध्ये एक प्रभाग वाढून या सार्वत्रिक निवडणुकीत १४ प्रभाग रचना निश्चित झाली आहे. प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवक मतदारांकडून निवडले जाणार आहेत. २०२२च्या मतदार नोंदीनुसार, शहरात ३४ हजार २३४ मतदार होते. विधानसभा निवडणुकीदरम्यान ३७०० मतदार वाढले. त्याचा विचार करून पुढील नियोजन केले जाणार आहे.