26.4 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeRajapurराजापूर पूररेषेचा प्रश्न लवकरच निकाली - मंत्री उदय सामंत

राजापूर पूररेषेचा प्रश्न लवकरच निकाली – मंत्री उदय सामंत

राज्यातील १७ शहरांचे पूररेषेचे प्रश्न निकाली काढले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राजापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील विकासकामांच्या उभारणीसाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासित करताना लोकांचे विविध प्रश्न आणि समस्या प्रशासनाने तत्काळ सोडवाव्यात, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज जनता दरबारामध्ये केली. यावेळी ग्रामीण भागातील रस्ते, वीजपुरवठा, शाळा इमारती आदी विकासकामांचे प्रश्न सोडवताना राजापूर शहराला सातत्याने भेडसावणारा पूररेषेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, राजापूरसह राज्यातील १७ शहरांचे पूररेषेचे प्रश्न निकाली काढले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी शहरातील समस्यांविषयी उल्हास खडपे, माजी नगराध्यक्ष हनिफ काझी, सुशांत मराठे, सुबोध पवार, अमृत तांबडे, विनोद पवार आदींनी प्रश्न उपस्थित केले. माजी उपनगराध्यक्ष संजय ओगले यांनी धोपेश्वर येथील देवस्थान इनाम जागांबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर बोलताना सामंत यांनी नगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रश्नांबरोबर तालुक्यातील प्रलंबित रस्ते, पूल, शाळा यांना तत्काळ निधी उपलब्ध करून देताना शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी रत्नागिरीच्या धर्तीवर नाना-नानी पार्कसाठी सुमारे १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. दिवटेवाडी येथील पाणी वितरण समस्या सोडवण्यासाठी सुमारे १० लाखांचा निधी देण्यात येणार आहे.

नगरपालिकेच्या ठेकेदारांच्या देयकाबाबत बोलताना येत्या आठ दिवसांत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांना दिले. शहरातील वैयक्तिक प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांसमवेत समोरासमोर चर्चा घडवून आणून प्रश्नांची सोडवणूक करण्याचे निर्देशही त्यांना या वेळी दिले. मोहन पाडावे यांनी कणेरी येथील उपस्थित केलेल्या पाणीप्रश्नावर बोलताना ग्रामपंचायतीकडून कोणतीही आडकाठी येत असेल तर त्याबाबत उचित कार्यवाही करून प्रश्न निकाली काढण्याचे निर्देश दिले. कोंड्ये येथील माधवी हर्डीकर यांनी महावितरणकडून शॉर्ट सर्किट होऊन नुकसान झालेल्या काजू बागायतीच्या नुकसान भरपाईबाबत विचारलेल्या प्रश्नावर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

जमीन खचण्याकडे लक्ष वेधले – चुनाकोळवण येथील सरपंचांनी या भागामध्ये जमीन खचण्याचे वाढलेले प्रमाण, पाचल सरपंचांनी ग्रामपंचायतींना सोलरलाईट सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीकडे पालकमंत्री यांचे लक्ष वेधले. सामंत यांनी अतिवृष्टीमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले असले तरी गणपतीपूर्वी हे प्रश्न सोडवण्याचे निर्देश दिले. ससाळे शाळेचे भूसंपादन, नादुरुस्त इमारतीबाबत सरपंच तांबे यांनी, तर शीळ सरपंच अशोक पेडणेकर यांनी गावातील नादुरुस्त रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला.

RELATED ARTICLES

Most Popular