गुहागर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी सर्वसामान्य जनतेला कलम १६८ च्या नोटिसा देण्याचे बंद करावे. भाजपच्या कार्यकर्त्याला दिलेल्या नोटिसीत नववर्ष, ३१ डिसेंबर, मराठा आरक्षण आणि ओबीसी आंदोलन, असा उल्लेख आहे. आरक्षण, आंदोलन कुठेही सुरू नाहीत. याचा अर्थ ही नोटीस हेतूपुरस्सर दिली आहे. अशा प्रकारे विनाकारण नोटिसी देण्याचे थांबवावे. पोलिस व शासकीय यंत्रणांनी पर्यटन व्यवसाय वाढीसाठी काम केले पाहिजे; परंतु गुहागरातील पोलिस अधिकारी विनाकारण पर्यटन व्यावसायिकांना नोटीस देत आहेत, असा दावा डॉ. विनय नातू यांनी केला. गुहागर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पोलिसांकडून पर्यटकांना आणि पर्यटन व्यावसायिकांना दिली जाणारी वागणूक हा गेले काही महिने वादाचा विषय बनला आहे. या वादात उतरत डॉ. विनय नातूंनी गुहागर पोलिस प्रशासनाला खडेबोल सुनावले. प्रसंगी गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याचा इशाराही दिला. त्याचवेळी पर्यटकांच्या सुरक्षेमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी घेतली आहे.
नाताळची सुटी आणि नववर्ष स्वागतासाठी गुहागर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक गर्दी करीत आहेत. सायंकाळी समुद्राचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करतात; मात्र सायंकाळी ६ नंतर पाण्यात असलेल्या पर्यटकांना पोलिस प्रशासन बाहेर काढते. त्यामुळे काही पर्यटकांनी गुहागरमधील बुकिंग रद्द केले. चित्रीकरणासाठी आलेल्या टीमलादेखील असाच पोलिसांचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे पर्यटन व्यावसायिक नाराज आहेत. हे असेच सुरू राहिले तर गुहागरातील पर्यटन व्यवसायाला दीर्घकाळ फटका बसेल, अशी भीती पर्यटन व्यावसायिकांना वाटत आहे. या संदर्भात डॉ. विनय नातू म्हणाले, अनेक पर्यटकांनी गुहागर तालुक्यातील बुकिंग बंद केले आहे. जिल्ह्याचा पर्यटनवाढीचा विकास थांबेल. याकडे वरिष्ठ पोलिसांनी लक्ष द्यावे, अन्यथा गृहमंत्र्यांकडे तक्रार करावी लागेल.