सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या अवकाळी पावसामुळे शेतकरी बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातून शेतकरी वर्गाला सावरण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करावेत व शेतकरी वर्गाला तातडीने आर्थिक नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर यांनी मनसेतर्फे केले आहे. त्यांनी प्रसिद्धीसाठी पत्रक दिले असून, त्यात म्हटले आहे की, हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यांदेखत मातीमोल होताना पाहताना गरीब शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत. भातपीक आडवे झाले असून, त्यांना कोंब फुटले आहेत.
अंगमेहनत करून, घाम गाळून पिकवलेली शेती निसर्गाच्या या प्रकोपामुळे भुईसपाट झाली असून यामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील पीक वाया गेले आहे. आपला शेतकरी रडत बसत नाही अगर आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलत नाही. याचा अर्थ तो आतून खचलाय असे होत नाही. अवकाळी पावसामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मानसिक धक्का बसला आहे, त्यातून शेतकरी वर्गाला सावरण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करावेत व केवळ पंचनामे करून न थांबता आपल्या शेतकरी वर्गाला तातडीने आर्थिक नुकसानभरपाई कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मनसेतर्फे जिल्हाध्यक्ष अॅड. केसरकर यांनी केले आहे.

