राज्याच्या अर्थसंकल्पात रत्नागिरी विमानतळाच्या विकासासाठी २४७ कोटींची आर्थिक तरतूद केली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी याची सभागृहात घोषणा केली. यातून टर्मिनस बिल्डिंगसह खासगी प्रवासी वाहतुकीच्यादृष्टीने विमानतळावर आवश्यक सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यामुळे लवकर हा विमानतळ सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रत्नागिरी विमानतळ येथून प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असणाऱ्या टर्मिनल बिल्डिंगच्या कामासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. त्यासाठी आवश्यक निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा उभारणीच्या कामाला गती आणि त्या लवकरच पूर्ण करण्याकडे कार्यवाही होणार आहे. रत्नागिरीतील मिरजोळे गावातील रत्नागिरी विमानतळ हे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या एमआयडीसी मालकीचे होते. आता ते पाळत ठेवण्यासाठी आणि शोध आणि बचावकार्यासाठी भारतीय तटरक्षक दलाचे स्टेशन म्हणून कार्यरत आहे.
महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीद्वारे (एमएडीसी) आता ३२०० चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेल्या नवीन पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंग, लिंक टॅक्सीचे आणि दोन एटीआर-७२ प्रकारची विमाने हाताळण्यास सक्षम एप्रनसह एक नवीन नागरी एन्क्लेव्ह विकसित केले जात आहे. विमानतळासाठी आणखी १७ एकर जमीन संपादित करण्यात आली. अनेकदा ढगाळ वातावरण असेल तर वैमानिक धोका न पत्करता लैंडिग टाळतो आणि नियोजित विमानतळाऐवजी अन्य जवळच्या विमानतळावर सुरक्षित विमाने उतरवली जातात. कोकणात पावसाळ्यात अनेकवेळा ढगाळ वातावरण असते अशावेळी विमान लँडिंग किंवा उड्डाणाला त्याचा फटका बसत असतो.
हे टाळण्यासाठी रत्नागिरी विमानतळावरच व्हीओआरडीएम ही यंत्रणा बसवली जाणार आहे. त्यामुळे विमानतळावरील दृश्यमानता वाढणार असून, वैमानिकाला विमान सुरक्षितपणे उतरवता येणार आहे. या विमानतळासाठी २७ हेक्टर जागेचे भूसंपादन करण्यात आले. आणखी १७ एकर जागा घेण्याची प्रक्रिया झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी येथून प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असणाऱ्या ट्रमिनल बिल्डिंगच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. २०२५-२६ या अर्थसंकल्पात रत्नागिरी विमानतळासाठी २४७ कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हे विमानतळ खासगी प्रवाशांच्या सेवेत लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे.
विमानतळावर डी-व्हीओआर यंत्रणा – रत्नागिरी विमानतळावर आता ढगाळ वातावरणातही विमान सुरक्षित लँडिंग (उतरणे) होणे आता सोपे होणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक डॉफलर व्हेरिपाय ओमनीरेंज (डी-व्हीओआर) ही यंत्रणा रत्नागिरी विमानतळावर बसवण्यात येणार आहे.