खेड येथील एका कंपनीशी निगडित असलेल्या खटल्यातून निर्दोष सुटका करण्यासाठी तब्बल ५ लाख रुपयांची मागणी करून त्यातील दीड लाख रुपये स्वीकारताना खेड न्यायालयातील सरकारी वकील राजेश देवराव जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. चिपळूण येथील एका हॉटेलमध्ये गुरुवारी (ता. ९) सायंकाळी ही कारवाई केली. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका कंपनीच्या संदर्भात एक खटला खेड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १ यांच्या न्यायालयात सुरू आहे. तक्रारदार वकील पत्राद्वारे बाजू मांडत आहेत, तर सरकारी अभियोक्ता म्हणून अॅड. जाधव सरकार पक्षाच्या वतीने काम पाहत होते. दरम्यान, २६ डिसेंबर २०२४ व ३ जानेवारी २०२५ ला झालेल्या पडताळणीमध्ये तक्रारदार यांना राजेश जाधव यांनी साक्षीदार यांना शिकवणार नाही. तुमचा खटला लवकर कसा सुटेल, यासाठी प्रयत्न करेन.
जास्त तपास न करता महत्त्वाचे मुद्दे वगळून संशयित आरोपी कसे सुटतील, यासाठी प्रयत्न करेन व खटला लवकर संपवायला मदत करेन. त्यासाठी ५ लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी तक्रारदाराकडे केली होती. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून दीड लाख रुपये देण्याचे ठरले होते. याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी चिपळूण येथील हॉटेल परिसरात गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजता सापळा रचला आणि दीड लाख रुपयांची लाच घेताना राजेश जाधव यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक संजय गोविळकर, अप्पर पोलिस अधीक्षक गजानन राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक सुहास शिंदे, रत्नागिरी क्षेत्राचे पोलिस अधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.