खरिपाचा हंगामातील भातशेती अंतिम टप्प्यात असताना तालुक्यामध्ये सध्या रब्बी हंगामाच्या शेतीची लगबग वाढली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात विविध फळभाज्यांसह कुळीथ आदीसाठी जमिनीची नांगरणी सुरू झाली आहे. काही ठिकाणी पेरण्या झाल्या असून काही ठिकाणच्या शेतांमध्ये रोपांची रूजवात झाल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. रब्बीच्या हंगामामध्ये शेतकरी कुळीथ, संकरित मका, कडधान्य, पावटा, मूग यांसारख्या विविध प्रकारच्या भाज्यांच्या बियाण्यांची पेरणी करतात.
सध्या नांगरणीची कामे वेगाने सुरू आहेत. भुईमुगासारख्या काही रब्बीतील पिकांना ओलाव्याची जमिन पेरणीला पोषक ठरत नाही. त्यामुळे दिवसागणिक वाढत जाणाऱ्या वातावरणातील उष्म्याच्या प्रमाणामुळे जमिनीतील ओलावा कमी होऊन जमीन तापू लागल्याने रब्बीतील अशा पिकांच्या पेरणीला पोषक वातावरण निर्माण होते. त्याचा फायदा घेत नांगरणी आणि अन्य मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे.