७ सप्टेंबर रोजी बाप्पाचे आगमन होत आहे. पण बाप्पाच्या स्वागतासाठी चाकरमानी पंधरा दिवस आधीपासूनच गावी मुक्कामाला जातात. गणपतीसाठी रेल्वेचे तिकिट मिळवणे हे एक दिव्यच असते. पण दरवर्षी कोकण रेल्वेकडून प्रवाशांसाठी अतिरिक्त गाड्या सोडण्यात येतात. गणपतीसाठी तिकिट बुक करायचं म्हटलं तर दोन महिने आधीपासूनच, तिकिट काढावे लागतात. तर कुठे तिकिट कन्फर्म होते. पण आता प्रवाशांना १० मेपासून तिकिट बुक करता येणार आहे. कोकण मार्गावर सोडण्यात येणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण १२० दिवस आधी म्हणजेच १० मेपासून खुले होणार आहे.
त्यामुळं भाविकांना पाच महिने आधीपासूनच ट्रेनचे तिकिट आरक्षित करता येणार आहे. त्यामुळं गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, नियमित रेल्वे गाड्यांसह व गणपती स्पेशल गाड्यांची आरक्षित तिकिटे मिळवण्यासाठी चाकरमान्यांची चढाओढ सुरूच राहणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात लाखो लोक जातात. या दिवसात कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांचे बुकिंग फुल असते. त्यामुळं काहीजणांना अधिकचे पैसे देऊन ट्रॅव्हर्ल्स किंवा खासगी गाडी करुन जावे लागते.
अनेकदा तर रेल्वेचे तिकिट मिळेल यांसाठी चाकरमानी पहाटेपासूनच तिकिट खिडक्यांवर रांग लावून उभे राहतात. मात्र, तासन् तास रांग लावूनही चाकरमान्यांच्या पदरी निराशाच पडते. सात सप्टेंबर रोजी यंदा गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे. तिकिट खिडक्यांबरोबरच ऑनलाइन तिकिट आरक्षित करण्यासाठीही प्रवाशांची झुंबड उडालेली असते. कोकण रेल्वे मार्गावर नेमक्या किती गणपती स्पेशल ट्रेन चालवणार आहेत हे मात्र अद्याप कोकण रेल्वेने जाहिर केलेले नाहीये. मात्र १० मेपासून, गणेशोत्सवात धावणाऱ्या गाड्यांचे आरक्षण खुले होणार आहे. १० मेपासून चाकरमानी गणपतीसाठीची तिकिट बुक करु शकतात.