खासगी बस पंक्चर काढण्यासाठी थांबली, पाठीमागून भरधाव वेगाने येणारा टेम्पो बसला घासून गेला. यामध्ये खिडकीला डोकं टेकून झोपलेल्या बालिकेचेचा करुण अंत झाला. काल (ता.१) सकाळी सात वाजता हा अपघात झाला. आदिती ब्रिजेश डिंगणकर (वय ७) असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. उन्हाळी सुटीसाठी ती गावी जात होती. महामार्गावरील खेड तालुक्यातील नातूनगरला हा अपघात झाला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, गोरेगाव मुंबई येथून अदिती ब्रिजेश डिंगणकर (वय ७) आपल्या कुटुंबीयांसोबत गुहागर तालुक्यातील जमशेद या गावाकडे खासगी बसने जात होती.
सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान कशेडी घाट उतरल्यानंतर बस पंक्चर झाल्याचे चालकाला जाणवले. नातूनगर बस स्टॉप महामार्गाच्या अगदी कडेला बस उभी करून पंक्चर काढण्याचे काम सुरू होते. बसच्या उजव्या बाजूला पाठीमागील खिडकीला डोके ठेवून आदिती झोपली होती. मृतदेह कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. आदिती बरोबरच तिच्या समोरच्या खिडकीत बसलेल्या एका प्रवाशाच्या देखील हाताला दुखापत झाली.
इंग्रजी शाळेत शिक्षण – आदिती डिंगणकर ही गोरेगाव येथील आदर्श विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिकत होती. तिचा पहिलीचा निकाल लागला. ती पास झाली. दुसरी इयत्तेची पुस्तके, वह्या देखील खरेदी केल्याचे तिच्या घरच्यांनी सांगितले. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत आदिती आपल्या गावी येत असे. यावर्षी गावी त्यांच्या नातेवाईकांचं लग्न असल्याने व शाळेला देखील सुट्टी लागल्याने आपल्या कुटुंबीयांसोबत जामसूद (ता. गुहागर) येथे येत होती. गावी पोहोचण्याआधीच काळाने तिच्यावर घाला घातला.