केंद्र शासनाच्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध विकासकामे करताना त्या द्वारे कुशल-अकुशल लोकांना गावामध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. त्याचवेळी आता शासकीय कार्यालयांसह शाळांच्या इमारतींच्या छतावरील पावसाचे पाणी संकलन करणारा रिन हार्वेस्टिंग’ प्रकल्प तालुक्यामध्ये राबवण्यात येत आहे. प्रस्ताव आलेल्या ५३ शाळा, ५ आरोग्यकेंद्र, २० ग्रामपंचायत, १२ अंगणवाड्या अशा ९० कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी १३ कामे पूर्ण झाल्याची माहिती पंचायत समितीकडून देण्यात आली.
कुशल आणि अकुशल लोकांना गावामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत संबंधित कामगाराला शासनाकडून किमान वेतन दिले जाते. या योजनेतून गावामध्ये विविध विकासकामे करताना आता छतावरील पाणी संकलन करणारा ‘रेन हार्वेस्टिंग प्रकल्प’ राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या संकल्पना आणि मार्गदर्शनाखाली, गटविकास अधिकारी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये रेन हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्यात येत आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर लोकांना गावामध्ये रोजगार मिळताना भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्याला मदत होणार आहे. या प्रकल्पांतर्गत ९० कामांना पंचायत समितीकडून कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. त्यापैकी डोंगर, कळसवली, कोळवणखडी, सोलगाव, तळवडे, येळवण या ग्रामपंचायतींतर्गत असलेली १३ कामे पूर्ण झाली आहेत.