25.8 C
Ratnagiri
Monday, September 16, 2024
HomeChiplunकोयना धरणाच्या पाचव्या टप्प्याला १० वर्षांनंतर चालना

कोयना धरणाच्या पाचव्या टप्प्याला १० वर्षांनंतर चालना

४० मेगावॅट क्षमतेचे दोन उदंचन जलविद्युत संचउभारणी करण्यात येणार आहेत.

कोयना धरणाच्या डाव्या तीरावर उदंचन स्वरूपाचा वीजप्रकल्प उभारणीला दहा वर्षांनंतर अखेर मान्यता मिळाली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर कोयना प्रकल्पाच्या या पाचव्या टप्प्याच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, महानिर्मिती यांच्यात या प्रकल्पाच्या उभारणीकरिता सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. बलगन यांनी तर जलसंपदा विभागातर्फे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांनी स्वाक्षरी केल्या.

कोयना धरण पायथा येथे ४० मेगावॅट क्षमतेचे दोन उदंचन जलविद्युत संचउभारणी करण्यात येणार आहेत. हे प्रकल्प उभारणीचे प्राथमिक काम जलसंपदा विभागातर्फे करण्यात आले होते; मात्र हा प्रकल्प २०१५ पासून अर्धवट आहे. कोयना धरणातून शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यापैकी ५५०० क्युसेक पाण्याचा वापर या प्रकल्पात होणार आहे. धरणापासून एक किमी अंतरावर ‘सिंगल लेकटॅप’ घेण्यात येणार आहे.

प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे एक हजार कोटींचा आहे. त्यात साडेचारशे कोटींचे टर्बाइन बसवले जाणार आहेत. प्रकल्प उभारणीचे काम ४० टक्के झाले आहे. कोयना बांधकाम प्रकल्प विभागाला डाव्या तीराचे काम देण्यात आले होते; मात्र स्थानिकांचे प्रश्न, कंत्राटदाराच्या कामात निर्माण झालेले अडथळे यामुळे २०१५ पासून हे काम पूर्णपणे ठप्प होते. आता उर्वरित उभारणी महानिर्मितीतर्फे करण्यात येणार आहे. त्यात काही खासगी कंपन्यांचाही सहभाग असणार आहे.

महाजनकोने या प्रकल्पासाठी ८६२.२९ कोटीच्या खर्चाला मान्यता दिली आहे. राज्यात पहिल्यांदाच कोयना प्रकल्पावर जर्मन बनावटीच्या ‘डेरियाज टर्बाइन’चा वापर होणार आहे. हे टर्बाइन एकाचवेळी पाणी उपसा आणि वीजनिर्मिती करू शकते. त्यासाठी रासाटी येथे बंधारा बांधण्यात येणार असून साठवलेले पाणी वीजनिर्मिती करून पुन्हा धरणात सोडण्याची योजना तयार करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular