कालपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने रत्नागिरी शहरात दाणादाण उडवून दिली. त्याचा फटका शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या वाहनधारकांना सर्वाधिक बसला. पावसाचे पाणी मुख्य बाजारपेठ असलेल्या रामआळी, गोखलेनाका, मारुती आळीत भरले होते. त्यामुळे व्यापारी, ग्राहकांची तारांबळ उडाली. काही दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे वस्तू व साहित्याचे नुकसान झाले. पादचाऱ्यांना पाण्यातून मार्ग काढतानाही कसरत करावी लागत होती. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सर्वत्र जोरदार पाऊस सुरू झाला आहे. या पावसाचा मोठा फटका रत्नागिरी शहराला बसला आहे. आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुख्य बाजारपेठेतील रामआळी, गोखले नाका, मारुती आळीमध्ये सुमारे दीड ते दोन फूट पाणी रस्त्यावरून वाहत होते. पाणी दुकानात शिरण्याची भीती निर्माण झाल्यामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. पाणी दुकानात शिरून नुकसान होऊ नये
यासाठी दुकानदारांची धावाधाव सुरू होती. पावसामुळे ग्राहकांची वर्दळही कमीच होती. त्यामुळे पावसाने व्यापाऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले. शहरात कोट्यवधीची गटारांची कामे करूनही सर्व पाणी रस्त्यावरून वाहत आहे. जास्त पाऊस पडतो, असे कारण सांगून राजकीय नेते त्यातून वेळ मारून नेतात; परंतु जास्त पावसाचा विचार करून गटारे का बांधली जात नाहीत, याकडे कानाडोळा करत असल्याचे सर्वसामान्य नागरिकच बोलत आहेत. पालिकेच्या नियोजनाअभावी शहरातील रस्त्यांवर साचलेल्या पाण्याचा निचरा होताना दिसत नाही. काही ठिकाणी गटारांची उंची वाढलेली आणि रस्ते खाली असे चित्र आहे तर अनेक ठिकाणी गटारांचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे शहरातील पाण्याचा निचरा होणार कसा, असा प्रश्न पडलेला आहे.
दोन दिवसांच्या पावसाने रत्नागिरी शहरातील गटारे आणि रस्त्यांच्या कामांचे नियोजन याबाबत पालिका उघड्यावर पडली आहे. काँक्रिटचे मुख्य रस्ते सोडले तर अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. या खड्ड्यांतून मार्ग काढताना नागरिक आणि वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. ऐन पावसात खड्डे बुजवण्याचे काम पालिकेने हाती घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे; मात्र या पावसाने पालिकेची तयारी उघड्यावर पडली आहे.
पाणी साचून तलावाचे स्वरूप – शहरातील आठवडा बाजारातील पटवर्धन हायस्कूलच्या प्रवेशद्वारावर तर पाणी साचून तलावाचे स्वरूप आले आहे. पाणी जाण्यासाठी गटार नसल्याने हा तलाव तयार झाला आहे. त्यातून वाट काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. विद्यार्थी, पालक आणि वाहनधारकांनी पालिकेच्या नावाने अक्षरशः शिमगा केला.