महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी दुपारी अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातील नंदनवन’ बंगल्यावर भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमागे दडलयं काय अशी चर्चा सुरू झाली असून ‘लवचिक’ भुमिकेचे हे संकेत तर नव्हेत असे बोलले जात आहे. मागील वर्षाच्या अखेरीस काही महिने आधी ठाकरे बंधूंची युती झाली. महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभा झाल्या. त्यात दोन्ही भावांनी महायुती सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. एकनाथ शिंदेंवरही या दोन्ही भावांची तोफ धडाडली होती. पण महापालिका निवडणुकांचे निकाल लागताच कल्याण-डोंबिवलीत मनसेनं शिंदेसेनेला पाठिंबा दिला. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात सेना-मनसेचे सूर जुळले. या पार्श्वभुमीवर गुरूवारी दोन्ही नेत्यांची झालेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.
युतीनंतर प्रथमच भेट – राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गाठीभेटी, बैठका याआधीही झालेल्या आहेत. पण ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर राज ठाकरे प्रथमच एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच भेट होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त राज ठाकरे यांनी एक खास पोस्ट केली होती. त्यात त्यांनी एका परिच्छेदात ‘लवचिक’ भूमिकेचा उल्लेख केला होता. विशेष म्हणजे, ही पोस्ट करण्याच्या काही दिवस आधीच मनसेनं कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदेसेनेला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता झालेली राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट याच ‘लवचिक’ भूमिकेची भाग आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
राजकीय जवळिक ? – महापालिका निकालांनंतर निवडणुकांच्या कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिंदेसेनेला पाठिंबा दिला आणि सत्तेत प्रवेश केला. यावरुन शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली. पण दुसरीकडे चंद्रपुरात शिवसेना उबाठानं भाजपला साथ दिली. त्यामुळे ठाकरेंच्या युतीतील बेबनाव ठळकपणे संमोर आला. त्यानंतर आता राज ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले. शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी ही भेट झाली. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या या भेटीच्यानिमित्तान राजकीय जवळिक वाढते का अशीही चर्चा सुरू झाली आहे.

