मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नवीन निवासस्थानी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नी भेट दिली. राज ठाकरे हे आपल्या नव्या घरामध्ये गेल्यानंतर प्रथमच देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या घरी आले आहेत. दरम्यान या दोन्ही नेत्यांमधली बैठकीमुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चांना उधाण आले आहे.
देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे राज ठाकरेंच्या नवीन निवासस्थानी शिवतीर्थावर गेले असता, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये हे दोन्ही नेते हास्यविनोद करताना दिसत आहेत.
ही एक कौटुंबिक भेट असल्याचं बोललं जात आहे. मात्र, तसे असले तरी या भेटीला केवळ कौटुंबिक भेट आहे असेही म्हणता येणार नाही. कारण, गेल्या काही दिवसांत राज ठाकरेंची हिंदूत्वाच्या संदर्भात घेतलेली भूमिका अतिशय महत्त्वाची ठरली आहे. यासोबतच मनसे आणि भाजप यांची आगामी मुंबई मनपाच्या निवडणुकांत युती होण्याचीही गेल्या काही दिवसांपासून संकेतवजा चर्चा सुरु आहे.
बऱ्याच कालावधीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. शिवाय पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. भाजप आणि मनसे युतीच्या चर्चा मधल्या काळात जास्तच प्रमाणात जोर धरत होत्या. त्या पार्श्वभूमीवरही ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
राज ठाकरे हे शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी राहायला आल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत त्यांच्या घरी सपत्नीक आले होते. यावेळी राऊत यांनी कन्येच्या लग्नाचं निमंत्रणही दिलं. त्यावेळी सुद्धा राऊत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास चर्चा सुरु होती. या दोन्ही नेत्यांमध्ये मनमोकळ्या गप्पाही झाल्या. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनीही राज यांच्या नव्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस राज ठाकरे यांच्या घरी जाऊन भेटल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.