आमदार राजन साळवी यांना लाचलुचपत विभाग रायगड यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने आलेल्या नोटीस विरोधात लांजा येथे महाविकास आघाडीच्या वतीने भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला.यामध्ये हजारो शिवसेना व महविकास आघाडीचे पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित झाले होते. यावेळी आमदार राजन साळवी यांच्या समर्थनार्थ देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. महाराष्ट्र शासनाच्या एकाधिकार शाही विरोधात भव्य एल्गार मोर्चा हजारोंच्या उपस्थितीत पार पडला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एकनिष्ठ आमदार राजन साळवी यांच्याविरोधात सरकारने केलेल्या दडपशाही विरोधात हजारोच्या संख्येने नागरिक जमले होते. यावेळी शिवसेना पक्षाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा ताई अंधारे यांनी त्यांच्या भाषणातून विरोधकांची चांगलीच दैना उडवली. शिंदे व फडणवीस सरकार व त्यांच्या मंत्र्यांवर जोरदार टीका केली गेली. तसेच आमदार राजन साळवी यांच्यासोबत असलेले शिवसैनिक हीच खरी ताकद असल्याचे सांगितले.
यानंतर लांजा तहसीलदार यांना एल्गार मोर्चा द्वारे निवेदन देण्यात आले. लाचलुचपत विभागाने राजकीय त्रास देण्याच्या हेतूने ही नोटीस देण्यात आली आहे,तरी ती चुकीच्या पद्धतीने देण्यात आली असून त्याचा निषेध करण्यासाठी हा एल्गार मोर्चा काढण्यात आल्याचे सांगितले. तसेच भविष्यात चुकीच्या पद्धतीने कारवाही झाली तर जिल्हा बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला.
या एल्गार मोर्चात शिवसेना पक्ष उपनेत्या सुषमा अंधारे, गौरीशंकर खोत,युवासेना राज्य विस्तारक शरद कोळी,संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक,जिल्हाप्रमुख विलास चाळके, सुभाष बने, रवींद्र माने, महमद रखांगी,महेश सप्रे, शमा थोडगे ,जगदीश राजपकर,जया माने,संदीप दळवी आदी पदाधिकारी, हजारो शिवसैनिक युवासैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.