राज्यात गुटखा बंदी केलेली असताना सुद्धा अनेक चोरी छुप्या पद्धतीने मागणी आणि पुरवठा केला जातो. त्यामुळे अनेक दुकानदार अशा प्रकारचे गुटखा आणि इतर पदार्थ बंदी असताना सुद्धा विक्रीसाठी ठेवतात. जिल्ह्यातील राजापूर शहरातील दोन व्यापार्यांवर धाड टाकून सुमारे १ लाख ३६ हजार २७० रुपयांचा गुटखा जप्त केला. दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करत चारचाकी वाहनही ताब्यात घेतले. सुमारे चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जवाहर चौकातील दुकानदार असीम अब्दुल रझ्झाक डोसानी आणि लियाकत शौकत सय्यद अशी या दोघा व्यापार्यांची नावे आहेत.
अटक केलेल्या दोन्ही व्यापार्यांना येथील दिवाणी न्यायालयात गुरुवारी हजर केले असता असीम डोसानीला २८ फेब्रुवारीपर्यंत तर लियाकत सय्यद याला २५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि राजापूर पोलिसांनी ही कारवाई केली. असीम डोसानी याच्याकडे १ लाख ३२ हजारांचा तर लियाकत सय्यद याच्याकडे ४ हजार २७० रुपयांचा विविध कंपन्याचा गुटखा पोलिसांना सापडला. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर व सहायक पोलिस उपनिरीक्षक वाघाटे करत आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि राजापूर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सापडलेला सर्व माल पोलिसांनी हस्तगत केला असून, दोन्ही दुकानदारांविरोधात भारतीय दंड विधान कलम २७२,२७३ आणि ३२८ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या काही अवैध गोष्टींकडे पोलिसांची बारीक नजर असून, अशा गुन्हेगारांच्या मागावर पोलीस कायम असतात.