कोकणामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती, झाडे यांचा समृद्धपणा आहे. त्यामुळे निसर्गावर संशोधन करणाऱ्या संशोधकांसाठी कोकण म्हणजे एक प्रकारे वरदान लाभलेले आहे. राजापूर तालुक्यातील विखारे-गोठणे येथे असलेल्या आबासाहेब मराठे महाविद्यालय परिसरातून नवीन फुलवनस्पती गणाचा शोध लागला आहे. या गणाचे नाव श्रीरंगिया हे जगद्विख्यात वनस्पतीशास्त्रज्ञ प्राध्यापक डॉ. श्रीरंग यादव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या नावावरून देण्यात आलेले आहे आणि प्रजातीचे नाव श्रीरंगिया कोंकनेन्सिस असे आहे तर श्रीरंगिया कोंकनेन्सिस हे नाव त्याच्या रहिवासीचे स्थान कोकण या नावावरून ठेवण्यात आले आहे.
कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, रयत शिक्षण संस्थेच्या मोखडा आणि आबासाहेब मराठे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अरुण चांदोरे आणि त्यांचे संशोधक विद्यार्थी देविदास बोरुडे आणि त्यांच्या बरोबर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच. पी. टी. आर्ट्स अँड आर. वाय. के. सायन्स कॉलेज मधील वनस्पतिशास्त्र चे सहाय्यक प्राध्यापक डॉ. कुमार विनोद गोसावी आणि त्यांचा संशोधक विद्यार्थी निलेश माधव यांनी चार वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर हे संशोधन केले आहे.
यापूर्वीही अतिशय दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या अनेक वनस्पतींचा शोध कोकणच्या दुर्गम भागामध्ये लागलेला आहे. त्यामुळे निसर्गातील अमूल्य ठेव्यांचे शोध आणि त्यांच्या संरक्षणासाठी असे अनेक संशोधक कोकणात येत असतात. अनेक स्थानिक प्राध्यापक देखील अशा संशोधनामध्ये सहभागी असतात. अर्थात त्यांच्या अभ्यास क्रमातीलच हा भाग आहे. अनेक तरुण संशोधक देखील अनेक काळ अशा दुर्मिळ वनस्पती बद्दल इत्यंभूत माहिती जाणण्याकरता त्याचा शोध घेत संशोधन सुरु ठेवले आहे.