कोकणामध्ये येण्यासाठी रेल्वेचा प्रवास हा नक्कीच सुखकारक आहे. आणि आता त्यामध्ये खुषखबर म्हणजे कोकण रेल्वेचे आत्ता विद्युतीकरण पूर्ण झाले असून, या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून चाचणीही पूर्ण झाली आहे. या बाबतचा अहवाल प्राप्त झाल्यावर या मार्गावरून प्रवासी रेल्वे गाड्या सुरु करण्यात येणार आहेत. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या प्रकल्पाचे अधिकृतपणे लोकार्पण करण्यात येणार आहे.
कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या ९७० किमी लांबीच्या रुळांवर विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. या विद्युतीकरणासाठी एकूण १२८७ कोटीं रुपये खर्च करण्यात आले आहेत. या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या माजी रेल्वे मंत्री खा. सुरेश प्रभू यांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना खा. प्रभू म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा रेल्वे मंत्री म्हणून मी काम करत असताना कोकण रेल्वेच्या विद्युती करणासाठी रेल्वे अर्थसंकल्पात तरतूद केली होती, आणि मी स्वत:ला भाग्यवान समजतो की त्याची मुहूर्तमेढ ही माझ्या मंत्री पदाच्या कारकिर्दीत केली होती.
आज कोकण रेल्वेच्या मार्गाचे विद्यतीकरण पूर्ण झाले असून ज्यामुळे पर्यावरण प्रदूषण नियंत्रित होवून, रेल्वे गाड्यांची गती वाढण्यास मदत होणार आहे. त्याच बरोबर इंधन व वेळेची बचत होवून जादा गाड्या या मार्गावर धावणार आहेत. याचप्रमाणे मी केलेल्या वीज सुधारणा कार्यक्रमातून आज ४०००० कोटींची येत्या काही वर्षात बचत घडून येणार आहे. विद्युतीकरण हा त्याच कार्यक्रमाचा एक भाग होता, असेही खा. प्रभू यांनी सांगितले.
२२ आणि २४ मार्च रोजी सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी पूर्ण झाली असून, रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या अहवालाची कोकण रेल्वेला प्रतीक्षा आहे. या अहवालानंतर या मार्गावर विजेवर धावणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू करण्यात येतील, असे रेल्वे अधिकाऱ्यांद्वारे सांगण्यात आले आहे.