शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणातील पक्षाचे जेष्ठ नेते रामदास कदम यांची नेते पदावरून हकालपट्टी केल्यानंतर कदम यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार करायला सुरुवात केली आहे. शिवसेना वाचवायची असेल तर तुम्ही राष्ट्रवादीचा नाद सोडा,असंही कदम यांनी म्हटलं. तसंच शिवसेनेतील ४० आमदार वेगळा विचार करत असतील तर उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असंही ते पुढे म्हणाले.
या पार्श्वभूमीवर गुहागर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्या म्हणण्यावर आक्रमक इशारा दिला आहे. ‘मला रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यावर एकदा बोलायचे आहे. मी घडत असलेल्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. कोण-कोण या बाबतीत आपले काय मत मांडत आहे, ते मी बघतोय. पण रामदास कदमांना मला एकदा रोखठोक उत्तर द्यावं लागेल आणि ते मी योग्य वेळी आली कि देईनच,’ असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
या सरकारने मविआ सरकारने घेतलेल्या जनहिताच्या अनेक कामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. ज्या मंडळींनी भाजपबरोबर जाऊन सरकार बनवले त्यामध्ये आधीच्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील नऊ मंत्री आहेत. मग त्यांनीच घेतलेले निर्णय चुकीचे होते का? १ एप्रिलला कामांचा निर्णय झाला, त्यामध्ये तुम्ही होतात मग तुम्ही आता गप्प कसे काय? असा थेट सवाल भास्कर जाधव यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना केला आहे.
भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढे करून आपला छुपा अजेंडा राबवत आहे. हे सरकार भारतीय जनता पार्टीचेच आहे. हे लोकांच्या मनावर बिंबवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्र सरकारचा तिढा सुप्रीम कोर्टामध्ये गेला आहे. परंतु, त्याचा निकाल लागेल असं वाटत होतं. अवघ्या जगाचे लक्ष याकडे लागलं होतं. पण हा निर्णय होऊ शकला नाही. याबद्दल फार काही आश्चर्य वाटत नसले तरी लोकशाहीची मात्र आता चिंता वाटू लागली आहे, ‘ अशा शब्दात जाधव यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.