23.4 C
Ratnagiri
Thursday, September 19, 2024

विराट कोहली एक हजारी क्लबमध्ये सामील होणार…

यजमान भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या...

या दिवशी थिएटरमध्ये फक्त 99 रुपयांमध्ये चित्रपट पहा…

चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 20...

चाकरमान्यांची कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्गावर गैरसोय

कोकणात सणाच्या निमित्ताने येणाऱ्या जाणाऱ्या चाकरमानी लोकांची...
HomeSindhudurgमालवणमध्ये राणे-ठाकरे गटात रणकंदन…

मालवणमध्ये राणे-ठाकरे गटात रणकंदन…

वातावरण निवळल्यानंतर नीलेश राणे यांनी कोसळलेले दगड पुन्हा तटबंदीवर उभे केले.

राड्यात दोन्ही गटांकडून आरोप प्रत्यारोप झाले. दगडफेक, चप्पलफेक, लाकूडफेक यांसारख्या प्रकारामुळे दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांसह काही पोलिस कर्मचारीही किरकोळ जखमी झाल्याचे प्रकार घडले. यामुळे राजकोट किल्ला परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर दोन तासांनंतर पोलिसांनी सुरक्षा कडे करत आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांना मार्गस्थ केले. राजकोट किल्ला येथील पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीने जनसंताप निषेध मोर्चाचे आयोजन केले होते.

यासाठी आदित्य ठाकरे, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत आले होते. भरड येथून सकाळी साडेअकराला जनसंताप निषेध मोर्चाला सुरुवात होणार होती. तत्पूर्वी महाविकास आघाडीचे सर्व नेते राजकोट किल्ला येथे घटनास्थळाच्या पाहणीसाठी गेले. याच दरम्यान माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, नीलेश राणे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पुतळा परिसराची पाहणी करून परतत होते.

वातावरण चिघळले – त्यानंतर राणे किल्ल्यात पाहणीसाठी पोहोचले; मात्र काही वेळात आदित्य ठाकरे यांचेही राजकोट किल्ल्याच्या परिसरात आगमन झाले. त्यानंतर राणे समर्थक आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना जिल्ह्यात प्रवेश देणार नाही, अशी भूमिका राणे समर्थकांनी घेतली, तर पंधरा मिनिटांत वाट मोकळी केली गेली नाही, तर आम्ही किल्ल्यात घुसू, असा इशारा ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिला.

पोलिसांची तारांबळ – यात पोलिसांची तारांबळ उडाली. शहरात जनसंताप निषेध मोर्चा होता. त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त, तसेच दंगल नियंत्रण पथक तैनात होते; मात्र राजकोट किल्ला येथे दोन गट अचानक एकमेकांना भिडल्यानंतर परिस्थिती बदलली. तेथे पोलिसांची अत्यल्प कुमक होती. त्यामुळे दोन्ही गटांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना रोखण्यात पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची मोठी दमछाक झाली.

भाजपही आक्रमक – दुसरीकडे भाजपचा गटही आक्रमक होता. माजी खासदार राणे आणि खासदार नारायण राणे यांनीही तीव्र शब्दात टीका केली. याची माहिती मिळताच भरड भागात जिल्हाभरातून आलेले ठाकरे गटाचे कार्यकर्ते, शिवप्रेमी यांनी राजकोट किल्ला येथे धडक दिली. यावेळी प्रवेशद्वाराच्या बाहेर ठाकरे गटाचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते दाखल झाले होते. किल्ल्यातील मध्यभागी राणे समर्थक, तर पुतळ्याच्या परिसरात ठाकरे गटाचे नेतेमंडळी, पदाधिकारी अशी स्थिती होती. त्यामुळे संपूर्ण किल्ला परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

संजय राऊत यांचा इशारा – संतप्त बनलेल्या माजी खासदार विनायक राऊत यांनी आम्ही ज्या मार्गाने किल्ल्यात आलो, त्याच मार्गाने माघारी परतणार आहोत. त्यामुळे भाजपची मंडळी बाजूला न केल्यास पुढे जी घटना किंवा प्रकार घडेल त्याला सर्वस्वी पोलिस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा दिला. सुमारे दोन तास हा वाद सुरू होता. याच दरम्यान मुसळधार पाऊस आला.

शिवसेनेच्या रणरागिणी भिडल्या – राजकोट परिसरात राडा सुरू असतानाच शिवसेनेच्या रणरागिणी गौरी मयेकर-सावंत व शिल्पा खोत हातात भगवा ध्वज घेऊन भाजपच्या ताफ्यात घुसल्या. यावेळी संतप्त भाजप महिला पदाधिकारीही आक्रमक बनत त्यांनी महिलांच्या हातातील झेंडा काढून घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी मारहाण होऊन देखील हातातील झेंडा सोडला नाही. यावेळी महिला पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांना बाजूला केले.

ढासळलेले दगड राणेंनी पुन्हा बसवले – या गोंधळात राजकोट किल्ल्याच्या तटबंदीवरील काही दगड खाली कोसळले. तणावाचे वातावरण निवळल्यानंतर नीलेश राणे यांनी कोसळलेले दगड पुन्हा तटबंदीवर उभे केले.

RELATED ARTICLES

Most Popular