दाभोळे (ता. संगमेश्वर) येथे बिबट्याचा दुर्मीळ पांढरा बछडा आढळून आला. ब्लॅक पँथर (काळा बिबट्या) पाहिला आहे; परंतु बिबट्याचा पांढऱ्या रंगाचा बछडा आढळून येण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच वेळ असल्याचा दावा वनविभागाने केला आहे. हे बछडे मादी बिबट्यासोबत पुन्हा रानात निघून गेले असून, त्यांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे येथे काजू लागवडीसाठी झाडे तोडण्याचे काम सुरू होते. सकाळी झाडे तोडण्याच्या कामाला सुरुवात केल्यानंतर मजुरांना बिबट्याचे दोन बछडे दिसले. विशेष म्हणजे त्यातील एक बछडा नियमित रंगाचा तर दुसरा विशेष आणि दुर्मीळ असा पांढऱ्या रंगाचा होता. या बछड्याचे डोळे देखील उघडलेले नव्हते. मजुरांनी लागलीच या बछड्याची छायाचित्रे टिपली. मात्र, शेजारीच असणाऱ्या मादीच्या आक्रमक पवित्र्याने घाबरलेली कामगार मंडळी तेथून लांब गेली. याची महिती तत्काळ वनविभागाला दिली.
वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल होईपर्यंत त्या बछड्यांची आईसोबत पुनर्भेट झाली. बिबट्या मादीने बछड्यांना रानात दुसऱ्या ठिकाणी नेले. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरा लावले आहेत. काही अभ्यासकांच्या मते, पांढरा बछडा हा काही वेगळी प्रजाती नाही. त्यांच्या शरीरात काही द्रव्यांची कमतरता निर्माण राहिल्याने असा रंग होतो. बिबट्यामध्ये ब्लॅक पँथरही असतो. तसेच, जंगलातील सर्व बिबटे काही आपल्या समोर येत नाहीत. पांढऱ्या वाघांप्रमाणे दुर्मीळ पांढरे बिबटेही जंगलात असू शकतात. दरम्यान, संगमेश्वरात आढळून आलेल्या बछड्याचे डोळे अजूनही उघडलेले नसल्याचे आणि ते दुर्मीळ असल्याने वनविभागाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
विशेष खबरदारी – बिबट्याचे पांढरा बछडा ही आमच्यादृष्टीने राज्यातील पहिलीच नोंद आहे. हा बछडा दुर्मीळ असल्याने त्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, खबरदारी घेतली जात आहे, असे चिपळूण येथील वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी सांगितले.