जगभर सगळीकडे कोरोनाचे सावट कमी अधिक प्रमाणात पसरले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सगळीकडे लॉकडाऊन असल्याने एकतर वर्क फ्रॉम होम सुरु आहे. नाहीतर सर्व शाळा, उद्योग व्यवसाय बंद झाल्याने सर्वजण एकाच छताखाली बंदिस्त आहेत. अनेक जणांनी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून नवीन काहीतरी ऑनलाईन छंद जोपासला तर काहींनी घरामध्येच काहीतरी कलाकुसरीच्या वस्तू इत्यादीचे छंद जोडले.
रत्नागिरी जिल्ह्यातील कलाध्यापकांनी मिळून एक नवीन छंद जोपासला आहे. जिल्ह्यातील या १५० कलाध्यापकांनी मिळून लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपल्या कलेचा सुयोग्य वापर करून ७०० पेक्षा अधिक एका पेक्षा एक सरस कलाकृती कागदावर चितारल्या आहेत. या कलाध्यापकांचा हा छंद म्हणजे कोरोनाच्या या नैराश्यमय परिस्थितीतून रंगाच्या संगतीने सकारात्मकतेकडे नेण्याचा एक मार्गच जणू.
जिल्हा कला अध्यापक संघटनेचे सचिव इम्तियाज शेख यांनी या उपक्रमासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामध्ये या १५० कलाध्यापकांनी मिळून एक व्हाटसअप ग्रुप तयार केला. त्यामध्ये दररोज किमान एक कलाकृती सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रत्येक कलाध्यापकाकडून उत्तम प्रतिसाद मिळत गेला आणि उतमोत्तम कलाकृती ग्रुप मध्ये जमा होऊ लागल्या. मग त्यामधून सर्वाधिक कलाकृती सदर करणाऱ्या शिक्षकाचा आठवड्यातील उत्तम कलाकार म्हणून सत्कार करण्यात येत असे. अशा प्रकारे झालेल्या कौतुकाने नक्कीच अजून हिरीरीने काम करण्यास प्रत्येकजण अजून उस्फुर्त होऊन कलाकृती सादर करू लागला.
या उपक्रमाचा लाभ इतर सर्वाना सुद्धा घेता यावा म्हणून सर्वांनी मिळून एक यू-ट्यूब चॅनल सुरु केले. आणि सर्व कलाप्रेमीनी या चॅनलचा अवश्य आस्वाद घ्यावा असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष बबन तिवडे यांनी केले आहे.