कोरोना निर्बंधित लसीकरणाचे काम सर्वत्र वेगाने सुरु आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सर्व मोठ्या शहरापासून ते अगदी लहान गावापर्यंत मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. परंतु, लसीकरण केंद्रावर होणारी एकाचवेळी गर्दी लक्षात घेता, रत्नागिरी संगमेश्वर मध्ये एक अनोखी योजना राबविण्यात आली आहे.
संगमेश्वर तालुक्याच्या सभापतींनी या योजनेबद्दल आग्रह धरला असून, त्यांनी स्वत: पुढाकार घेत साखरपा आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अदाते आणि ग्रामीण कृती दलाच्या सदस्यांची एकत्रित बैठक घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये समाविष्ट होणार्या प्रत्येक गावांना उपलब्ध होणारी लस गावाप्रमाणे वेगळी देण्यात येण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून लसीकरणासाठी लांबून येणाऱ्या लोकांना वाहतुकीचा खर्च पडू नये आणि लसीच्या डोस बदल माहिती कळल्यावर एकाचवेळी होणारी गर्दी टाळून सुटसुटीत लसीकरण कार्यक्रम राबविता येईल.
काही गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे ही केंद्रापासून दूर असल्याने सर्व आसपासच्या गावातील लोकांना सुद्धा लस मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे साखरपा प्राथमिक केंद्र परिसरामध्ये येणारे, ओझरे, वांझोळे आणि किरबेट ही उपकेंद्रे येतात. लसीकरणाची व्यवस्था गाव तिथे लस याने केली जात असल्याने त्या त्या आरोग्य केंद्रामध्ये लसीचा साठ उपलब्ध करून दिला जात आहे, त्यामुळे एक तर वाहतुकीचा होणारा खर्च आणि लसीसाठी होणारी गर्दी या गोष्टींवर आळा बसण्यात यश आले आहे.
आतापर्यंत नियोजनबद्ध लसीकरण सुरु असून, किरबेट, भडकंबा या गावांसाठीचे लसीकरण नियोजन यशस्वीरित्या पार पडले आहे. पुढील वांझोळे गावासाठीच्या लसीकरणाचे डोस तेथील उपकेंद्रामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे लसीकरण करण्याने गावासमान सर्वाना लसीचा पुरवठा होऊ शकतो. तसेच लसींचा जास्तीत जास्त पुरवठा व्हावा म्हणून सभापती जयसिंग माने कायम सक्रीय असतील असे आश्वासन देण्यात आले आहे.