रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे तेल रिफायनरी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यापूर्वी येथील स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प पूर्ण केला जाईल, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला. रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे होणाऱ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात बैठक घेण्यात आली.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कोकणातील रिफायनरी संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठकीनंतर पत्रकार परिषदेत माहिती देताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की,”रत्नागिरीतील राजापूरमधील प्रस्तावित बारसू-सोलगाव येथील रिफायनरीला कोयना धरणातून पाणीपुरवठा करण्याचा तत्वत: निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी होणारे भूसंपादन, पाणी पुरवठा आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी स्थानिक आमदार राजन साळवी यांनी प्रकल्पाला पाठिंबा देत सरकारच्या भूमिकेला समर्थन दिले. बारसू येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी एकूण ६२०० एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यापैकी २९०० एकर जमीन संपादित करण्यात आली असून या प्रकल्पामुळे दोन लाख कोटींची थेट गुंतवणूक होणार आहे. यातून सुमारे एक लाख रोजगार निर्माण होणार आहेत.
दरम्यान, या भागातील ७०-८०% शेतकरी, स्थानिकांनी या प्रकल्पाला पाठिंबा दर्शविला आहे. येथील जनतेच्या मागण्या पूर्ण करण्याचा आमचे सरकार प्रयत्न करेल, या प्रकल्पामुळे येथील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. प्रकल्पाबाबत असलेले जनतेचे गैरसमज दूर केले जातील. याशिवाय जमिनीच्या दराबाबत शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती दिली जाईल. प्रकल्पासोबत या भागात एक अद्ययावत असे सुपर स्पेशालिटी रुग्णालय देखील उभारण्यात येईल. व्यापक जनजागृती करून नागरिकांचे प्रकल्पाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यात येतील, असे यावेळी सामंत यांनी स्पष्ट केले.