HomeRatnagiriभैरी-शिवाची अभूतपूर्व भेट: रत्नागिरीत श्रावणी सोमवारी हजारो भक्तांच्या साक्षीने पार पडला भव्य...

भैरी-शिवाची अभूतपूर्व भेट: रत्नागिरीत श्रावणी सोमवारी हजारो भक्तांच्या साक्षीने पार पडला भव्य सोहळा

ढोल-ताशांचा गजर अन् अभंगाच्या सुरांमध्ये राजीवडा येथे श्रीदेव काशीविश्वेश्वर आणि श्रीदेव भैरी देवांची भेट

रत्नागिरी: पवित्र श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी रत्नागिरी नगरी भक्तीरसात चिंब भिजून निघाली. शहरातल्या राजीवडा येथील श्रीदेव काशीविश्वेश्वर आणि रत्नागिरीकरांचे आराध्य ग्रामदैवत मांडवी येथील श्रीदेव भैरी या दोन प्रमुख दैवतांच्या पालखी भेटीचा अत्यंत मंगल व अभूतपूर्व सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. “काय वर्णू ती मी शोभा आजच्या दिनाची, भेट झाली पहा हो भैरी-शिवाची…” या भावस्पर्शी अभंगाचे सूर आणि ढोल-ताशांच्या अखंड गजराने अवघा राजीवडा परिसर दुमदुमून गेला होता.

नामसप्ताहाची सांगता आणि भव्य पालखी मिरवणूक

कोकणातील समृद्ध धार्मिक परंपरेनुसार, श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी श्रीदेव काशीविश्वेश्वर आणि मांडवी येथील श्रीदेव भैरी मंदिरांमध्ये अखंड नामसप्ताहाचा प्रारंभ होतो. या नामसप्ताहाची सांगता श्रावणातील दुसऱ्या सोमवारी मोठ्या उत्साहात केली जाते. सांगतेच्या शुभमुहूर्तावर श्रीदेव काशीविश्वेश्वराच्या भेटीसाठी श्रीदेव भैरी देवाची पालखी मांडवी येथून वाजत-गाजत राजीवड्याकडे प्रस्थान करते.

परंपरेनुसार, मांडवीतून निघालेली श्रीदेव भैरींची पालखी विठ्ठल मंदिर, तेली आळी नाका आणि खडपेवठार मार्गे राजीवडा धारेवरून काशीविश्वेश्वर मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाली. या मिरवणुकीत संपूर्ण रत्नागिरी शहरातून अबालवृद्धांसह हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते.

पाच प्रदक्षिणा आणि भेटीचा अविस्मरणीय क्षण

राजीवडा मंदिरात पोहोचल्यानंतर श्रीदेव काशीविश्वेश्वराच्या पालखीने मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. मंदिराला घातल्या जाणाऱ्या एकूण पाच प्रदक्षिणांपैकी तिसऱ्या प्रदक्षिणेच्या वेळी दोन्ही दैवतांच्या पालख्या समोरासमोर आल्या आणि ऐतिहासिक ‘भैरी-शिव भेट’ घडून आली.

दोन्ही पालख्यांची भेट होताच उपस्थित भाविकांनी जयघोष केला. ढोल-ताशांचा दणदणाट, टाळ-मृदुंगाचा नाद आणि गुलालाची उधळण यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. हजारो डोळ्यांनी या विलोभनीय भेटीचा आनंद अनुभवला.

RELATED ARTICLES

Most Popular