रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. चौपदरीकरणासाठी डोंगर फोडून रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. परंतु अशा घटनांमुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. कालच खेड जवळील भोस्ते घाटात सुरुंग लावण्यात आला होता. त्यामुळे मोठी दरड कोसळली असल्यानं त्याचा फटका वाहतुकीला बसला आहे. डोंगर फुटून मोठ्या प्रमाणात दगड आणि माती महामार्गावर आल्याने महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आणि काही वेळामध्येच मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ही वाहतूक पूर्ववत करण्यासाठीचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक खेड जवळ ठप्प झाली आहे. मुंबई-गोवा या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या वेगवान गतीने सुरू आहे. यातच खेड जवळील भोस्ते घाटात सध्या रुंदीकरणाचे काम वेग घेत असताना दुपारच्या वेळेस वाहनांची वाहतूक कमी असल्या कारणाने या घाटात असणारा डोंगर फोडण्यासाठी सुरुंग लावण्यात आला. परंतु या सुरुंगाच्या झालेल्या स्फोटामुळे डोंगर फुटून त्याची माती संपूर्ण रस्त्यावर आली, त्यामुळेच हा महामार्ग ठप्प झाला होता. सध्या या रस्त्यावर माती आणि दगडाचा ढिगारा हटवण्याचे काम सुरु होते. वाहतूक कोंडी फुटावी यासाठी अर्धा तासातच ही दरड बाजूला केल्याने महामार्ग मोकळा करण्यात आला.
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात चौपदरीकरणाचे कामासाठी सुरुंग लावल्याने दरड कोसळल्याने महामार्गावर आलेली दरड बाजूला करून, जी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती ती आत्ता काही तासातच पूर्ववत झाली असून, महामार्गावरील वाहनांची रांग मार्गस्थ झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सुद्धा सुटकेचा निश्वास सोडला.

