चिपळूण शहरामध्ये मागील वर्षी उद्भवलेल्या महापुराच्या संकटामुळे, नद्यांचे गाळ काढण्याचे काम वेगाने सुरु आहे. नद्यांच्या गाळाचा अनेक वर्षे उपसाच न केल्याने, झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याचा निचरा व्हायला जागाच शिल्लक नसल्याने, महाभयंकर स्थिती निर्माण झाली. ती परिस्थिती भविष्यात उद्भवू नये यासाठी मोठ्या प्रमाणात जिल्हा प्रशासन कार्य करत आहे. याच कामाचा आढावा घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी सुरु असलेल्या स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
चिपळूण शहरातून जाणाऱ्या वाशिष्टी व शिव नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा जिल्हाधिकारी डॉ. बी. एन.पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला व पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी संबंधित विभागाला मान्सून पूर्वी जास्तीत जास्त मनुष्यबळ व यंत्रसामुग्रीचा वापर करून गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार श्री.सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता बागेवाडी, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे मुंबई – गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील रस्ता रुंदीकरणाच्या कामाची जिल्हाधिकारी डॉ. बी. एन.पाटील यांनी पाहणी केली. व आढावा घेतला. येणाऱ्या मान्सून पूर्वतयारीचा अनुषंगाने राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना आवश्यक त्या उपायोजना व योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील तहसीलदार विजय सूर्यवंशी, राष्ट्रीय महामार्ग पेण विभागाच्या उप अभियंता मेश्राम, रत्नागिरी विभागाचे कार्यकारी अभियंता जाधव, उपअभियंता मडकईकर हे उपस्थित होतेदिवसाला सहा तास वाहतूक बंद ठेऊन या कामाला लवकर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.