सोशल मीडियावर रत्नागिरीमध्ये घडणारे गुन्हे, चोऱ्या, लुटमार याबाबत अनेक वृत्त प्रसिद्ध होत आहेत. त्यामध्ये मुले पळवणाऱ्या टोळी बाबत देखील अनेक वृत्तांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी त्या संदर्भात केवळ अफवा पसरवल्या जात आहेत, कोणतीही मुले पळवणारी टोळी रत्नागिरीमध्ये सक्रीय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात उद्भवणारी भिती कमी करण्यासाठी सर्व पोलिस ठाणेनिहाय जनगाजृती सुरू करण्यात आली आहे. मुलांसाठी शिक्षण हेच प्रभावी अस्त्र असून पसरणाऱ्या अफवांमुळे मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडू देऊ नका असे आवाहन त्यांनी केले आहे.
जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा कायदा सुव्यवस्था राखण्यास अतिशय सक्षम आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाणे-येणे सोपे व्हावे यासाठी नाटे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गरजू आणि दुर्गम भागातील ५२ विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले, त्याप्रसंगी अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी दिली आहे.
सोशल मीडियावर अफवांबाबत पालकांच्या मनातील भिती कमी करण्याच्या उद्देशाने आम्ही जिल्ह्यात जनजागृती सुरू केली आहे. मुलांचे शिक्षण महत्वाचे असून त्या प्रवाहात ते राहावेत, निर्धास्तपणे ते शाळेत यावे जावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नाटे पोलिस ठाणे हद्दीमधील दुर्गम, अतिदुर्गम भागात असणाऱ्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप कार्यक्रम करण्यात आला.
जेणेकरून दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहचणे व वेळेवर घरी येणे सुलभ होईल. राजापूर व नाटे पोलिसांनी ८ शाळेतील २७ मुले व २५ मुली अशा एकूण ५२ विद्यार्थ्यांना सीएसआरच्या निधीतून मोफत सायकल वितरण करण्यात आल्या असल्याने या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती प्राप्त होणार आहे. कोणतीही अशा प्रकारची घटना आजूबाजूला घडत असेल तर, पोलिसांच्या मदतीसाठी ११२ वर संपर्क केल्यास जलद प्रतिसाद मिळतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे स्पष्ट केले.

