इंदोर, अहमदाबाद आणि दापोली येथे दूषित पाण्यामुळे उद्भवलेल्या गंभीर सार्वजनिक आरोग्य संकटांच्या पार्श्वभूमीवर, रत्नागिरीत अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी पावले उचलणे अत्यावश्यक आहे, असे निवेदन माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर आणि पत्नी हिमानी कीर यांनी नगरपालिका, जिल्हा प्रशासन, उपविभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच नगराध्यक्षांना दिले. यावर योग्य ती कारवाई न झाल्यास राष्ट्रीय हरित लवादाकडे जाण्याचा इशारा त्यांनी यातून दिला आहे. रत्नागिरी शहर व परिसरातील नैसर्गिक जलप्रवाहांमध्ये होत असलेल्या अप्रक्रिया सांडपाणी विसर्गाबाबत गंभीर इशारा दिला आहे. कोकण नगर व साळवी स्टॉप परिसरातील सांडपाणी थेट शिरगाव ओढ्यात सोडले जात असल्याच्या तक्रारी आहेत. हा ओढा नाला नसून, नैसर्गिक जलप्रवाह असून त्याचा थेट परिणाम भूजल, विहिरी, बोअरवेल, शेती व नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
दापोली तालुक्यातील आडे व उटंबर गावांत ३०-४० नागरिक जुलाबाच्या साथीने बाधित झाले. प्राथमिक अंदाजानुसार, कारण दूषित पाणी. ही घटना आज दुर्लक्ष, उद्या आपत्ती ओढवणारी आहे, असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला. रत्नागिरी शहरातून ओसवाल नगर-फणशी-वरचा/खालचा फागर वाठार-सावंत नगरमार्गे जाणारे जलप्रवाह पुढे खारफुटी असलेल्या परटवणे खाडीमध्ये मिळतात. सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट खाडीत व समुद्रात सोडले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. साळवी स्टॉप येथील बेकायदेशीर कचऱ्याचे ढीग वारंवार पेट घेत असून, विषारी धूर शहराच्या वरच्या भागात पसरतो ही बाब पत्रात नमूद आहे. कार्यालयासमोरील उघडी सांडपाणी वाहिनी संरक्षक अस्तराविना असल्याने भूजल झिरपणं व विहिरी दूषित झाल्याच्या तक्रारी आहेत. ही स्थिती लाजिरवाणी व चिंताजनक असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे.
कायदेशीर कारवाई अपेक्षित – नैसर्गिक जलप्रवाहात अप्रक्रिया सांडपाणी सोडणे, हा वॉटर प्रिव्हेंशन अॅण्ड कंट्रोल पोल्यूशन अॅक्ट १९७४ अंतर्गत गुन्हा असून, संविधानाच्या अनुच्छेद २१ चा भंग आहे. कारवाई न झाल्यास राष्ट्रीय हरित लवाद (NGT) कडे जाण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

