रत्नागिरीमध्ये पुढील वर्षी जुलै, ऑगस्टमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतीच एका समितीने जिल्हा रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालय आणि महिला रुग्णालयाची पाहणी केली आहे. आता मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची (एमसीआय) समिती पाहणी करण्यास रत्नागिरीमध्ये दाखल होणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊ शकते.
महाविद्यालयाविषयी पुढे त्या म्हणाल्या की, जिल्हा रुग्णालयात २००, महिला रुग्णालयात १०० आणि प्रादेशिक मनोरुग्णालयात ३५० बेडची क्षमता आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्व निकष आम्ही पूर्ण करत आहोत. महाविद्यालय सुरू झाल्यास येथेच डॉक्टर तयार आणि उपलब्ध होतील. रत्नागिरीचा विचार करता खासगी डॉक्टर्स, रुग्णालयांची संख्यासुद्धा वाढत आहे. तरीही जिल्हा रुग्णालयामध्ये देखील दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
जिल्हा रुग्णालयात भूलतज्ज्ञ, स्त्री रोगतज्ज्ञ, फिजिशियन प्रत्येकी एक उपलब्ध आहेत. तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहेत; परंतु उपलब्ध कर्मचारी तितक्याच ताकदीने रुग्णालयाचे कामकाज चालवत आहेत. क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर येथे उपचार होत आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी उपकरणे घेण्यासाठी प्रयत्न आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निधी मंजूर होणार आहे. त्यामुळे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढेल. तसेच कामथे, दापोली येथे अतिदक्षता विभाग वर्षअखेरीपर्यंत सुरू करण्याचा मानस आहे. त्याकरिता प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती डॉ. फुले यांनी दिली.
डॉ. फुले यांनी सांगितले की, मी पदभार स्वीकारला, तेव्हा सुमारे १५०० दिव्यांगांचे प्रमाणपत्रासाठीचे प्रस्ताव प्रलंबित होते; परंतु आज फक्त ७६ प्रस्ताव प्रलंबित आहेत. २०१८ पासून आजपर्यंत रुग्णालयाकडे १६ हजार ७२४ अर्ज आले व त्यातील १३ हजार ८८१ दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यात आले. त्यामुळे रत्नागिरीमध्ये वैद्यकीय कॉलेज सुरु होणे हे नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.