रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना व्हायरसची स्थिती पाहता, लसीकरण मोहिमेवर जास्तीत जास्त भर देण्यास शासनाने सुरुवात केली आहे. ग्रामीण भागापासून ते लहान प्रभागापर्यंत लसीकरण करण्याकडे कडक लक्ष शासन ठेवून आहे. त्यांमुळे गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर कमी होताना दिसत असला तरी कोरोना संक्रमितांच्या संख्येचा आकडा दररोज पाचशे ते सहाशेच्या दरम्यानच आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागासह जिल्हा शासकीय रुग्णालयाने त्यावर उपाययोजना म्हणून चाचण्याची क्षमता दिवसाला जास्तीत जास्तीत वाढविणे आणि लसीकरण कार्यक्रम वेगाने राबविण्यासाठी राज्य शासनाकडून चार तज्ज्ञ अधिकाऱ्यांची टीम पदनियुक्त करण्यात आली आहे. तसेच चौघांही डॉक्टरांना रत्नागिरीत तत्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले गेले आहेत. आरोग्य सेवा संचालनालया कडून हे पत्र काढण्यात आले आहे.
रत्नागिरीच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांची पुणेला बदली झाली असून, त्यांच्या जागी प्रतिनियुक्ती म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. अनिरुध्द आठल्ये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच बीडच्या जिल्हा माता बाल व संगोपन अधिकारी डॉ. स्वाती बाळकृष्ण कांबळे यांची जिल्हा रुग्णालय येथे निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून वाशिम येथील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख, कोविड व्यवस्थापनेत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सहकार्य म्हणून नाशिकचे डॉ. गोविंद चौधरी, पुणे येथील सहायक संचालक डॉ. दिलीप माने यांना पदनियुक्त करण्यात आले आहे.
आरोग्य संचालनालयाने या चारही आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या स्थळी तात्काळ रुजू होऊन, तेथे असलेल्या सर्व परिस्थितीचा अहवाल संबंधितांना सादर करण्यात यावा, अशा सुचना दिल्या आहेत.

