रत्नागिरीमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला असताना, गेले ४ दिवस पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. पावसाचा आणि वाऱ्याचा जोर एवढा होता कि, बाजारपेठेमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेक जणांचे संसाराची दैना उडाली आहे. काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने किनाऱ्यालगतच्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीच्या पाण्याबरोबर एक दुचाकी आणि एक चारचाकीही वाहून गेली आहे.
गेले ४ दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले, आणि या तुंबलेल्या पाण्याने वाट मिळेल तिथे मार्ग पकडला. अनेक लोकांच्या घरामध्ये रात्री उशिरा पर्यंत पाणी शिरत होते, त्यामध्ये पावसाचा असणारा वेग लक्षात घेता पाणी ओसरणे अशक्य बनले होते. मच्छीमार्केट परिसरामधील काही कुटुंबांचे स्थलांतरण करण्यात आले.
रत्नागिरीसह राजापूर, संगमेश्वर तालुक्यांना मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा मिळाला आहे. रत्नागिरीमध्ये सुमारे २०० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे टेंभ्ये आणि पोमेंडी या गावांना जोडणाऱ्या पुलावरून एका व्यक्तीची आणि एका व्यक्तीची नॅनो कार वाहून गेली. गाडीतील व्यक्तींना बाहेर काढण्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सखल भागात असणाऱ्या सोमेश्वर मध्ये रात्री उशिरा पाणी शिरायला सुरुवात झाली होती. परंतु साधारण रात्री २ च्या दरम्यात पावसाचा वेग कमी झाल्याने पाण्याच्या पातळीमध्ये घट व्हायला सुरुवात झाली. परंतु, पुन्हा पाऊस वाढेल आणि घरात पाणी शिरण्याची भीती असल्याने अनेक रत्नागिरीकरांनी रात्री जागून काढल्या. ज्या ठिकाणी पाणी पातळी वाढली त्या ठिकाणी एनडीआरएफ च्या पथकाने जाऊन पाहणी केली.