कोरोनामुळे गेल्या २ महिन्यांपासून कडक संचारबंदी असल्याने अनेक उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. काही अत्यावश्यक सेवेमध्ये असणाऱ्या व्यवसाया व्यतिरिक्त इतर कोणतेही व्यवसाय सुरु नाहीत. रत्नागिरी मध्ये रत्नागिरी जिल्हा फोटो, व्हिडीओ व्यावसायिक संघाने प्रशासनाकडे शासनाचे नियम पाळून फोटो स्टुडिओ उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यात सुरु झालेल्या कोरोना महामारीचा संसर्ग कमी जास्त प्रमाणात वाढतच आहे. गेले २ महिने तर रत्नागिरी पूर्णत: ठप्प झाली आहे. मागील वर्षातील फेब्रुवारी ते मे, ऑक्टोबर ते डिसेंबर आणि चालू वर्षातील फेब्रुवारी ते मे रत्नागिरी जिल्ह्यातील फोटो व्यावसायिकांचा लग्नकार्याचा मोसम निघून गेल्याने आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. फोटो स्टुडिओ व्यवसायाची गणना अत्यावश्यक सेवेमध्ये करण्यात यावी अशी मागणी रत्नागिरी जिल्हा फोटो, व्हिडीओ व्यावसायिक संघाने प्रशासनाकडे केली आहे.
कोणत्याही शासकीय कामासाठी फोटो आवश्यक असतो. मग ते आधार, पॅन शेतकरी कर्ज घेण्यासाठी फोटो लागतो. परंतु, रत्नागिरी मधील कोरोना स्थिती पाहून शासनाच्या नियमाचे व्यावसायिकांनी पालन करून व्यवसाय बंद ठेवले. त्यामध्ये लग्नकार्याचे तीन मोठे हंगाम पूर्णपणे वाया गेले. शासन नियमावली करते, त्यामध्ये काय उघडणार, काय बंद राहणार या यादीमध्ये फोटो स्टुडिओ व्यावसायिकांचे नाव एकदा सुद्धा आलेलं नाही.
फोटोग्राफी व्यावसायिक कायम दुर्लक्षितच का ? फोटो स्टुडिओ व्यावसायिकांनी जर स्टुडिओ इतके महिनोन्महिने बंद राहिले तर कमवायचे कसे, उदरनिर्वाह करायचा कसा, व्यवसाय बंद ठेवून कुटुंबांचे प्रत्येक क्षणी होणारे हाल फक्त बघत राहायचे की आत्महत्या करायच्या, असा प्रश्न वारंवार त्यांना पडत आहे. व्यावसायिक शासकीय नियम, अटी शर्थींचे पालन करून सोशल डिस्टंन्सिंग आणि सॅनिटायझेशन करून ठराविक तास सेवा करू इच्छितो, तर आम्हाला आमचा व्यवसाय करण्यास मुभा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.