गेले वर्षभर कमी अधिक प्रमाणामध्ये सुरु असलेले लॉकडाऊन, त्यामुळे व्यापारीवर्ग मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. उदरनिर्वाहाचे तेवढेच साधन असल्याने आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात ढासळत चालली आहे. त्यामुळे काल केल्या गेलेल्या पुन्हा अधिकच्या ८ दिवसाच्या कडक लॉकडाऊनच्या घोषणेमुळे व्यापारी वर्ग संतापून उठला आहे. काल रत्नागिरी व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष निखिल देसाई देसाई यांनी लॉकडाऊन करायचा असेल तर कडक करा अन्यथा सर्व दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी. येत्या २४ तासांमध्ये जर या निर्णयावर फेरविचार केला गेला नाही तर सगळी दुकाने उघडण्यात येतील, असाही इशारा दिला होता. लॉकडाऊन हे फक्त दुकानं किंवा हॉटेल साठी मर्यादित न ठेवता, सर्व शासकीय / खाजगी कार्यालये, बँक, रेल्वे वाहतूक सेवा, औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या, एस.टी. वाहतूक यासुद्धा पूर्णपणे बंद करण्यात याव्यात, अर्धवट असलेले लॉकडाऊन खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे लॉकडाऊन फक्त कागदोपत्री न करता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. अशी कठोर भूमिका काल जिल्ह्यातील व्यापारी संघटनांनी मांडली होती.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज जिल्ह्यातील व्यापाऱ्यासोबत चर्चा करण्यासाठी तातडीची बैठक बोलावली, या बैठकीसाठी जिल्हाधिकारी मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग आणि जिल्ह्यातील व्यापारी संघटनेचे एकूण ७० प्रतिनिधी उपस्थित राहिले होते. त्यांनी आपल्या समस्या नाम. सामंतांना सांगितल्या. त्यावर अजून थोडी कळ सोसून, व्यापाऱ्यांनी शासनाने आखून दिलेले सर्व नियमांचे पालन करून शासनाला सहकार्य करण्याची विनंती केली आहे. कारण कोरोनाचे रत्नागिरीवर घोंघावणाऱ्या संकटाची भीषणता पाहता सर्वांनी एकमेकांना सहकार्य करूनच या महामारीतून बाहेर पडणे शक्य होणार असल्याचे सांगितले, त्यामुळे इतके महिने जसे सहकार्य केले तसेच सहकार्य पुढील काही दिवस कराल अशी अपेक्षा व्यक्त करत आहे.
व्यापार्यांनी कालची भूमिका बदलून शासनाला सहकार्य करण्याचे एक मताने मान्य केले. परंतु, कडक लॉकडाऊन लावण्याआधी एक दिवसाचा अवधी वाढवून मिळावा अशी त्यांनी मागणी केली. व्यापाऱ्यांच्या समस्या आणि त्यांनी केलेल्या विनंतीनुसार अनेक मुद्यांवर चर्चा झाल्यावर काही प्रमाणात तात्पुरते तोडगे सुद्धा मिळाल्याने सर्वांचे एकमत झाले. त्यानुसार रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी पुढील ८ दिवसाच्या कडक संचारबंदी साठी आखण्यात आलेली नियमावली आज दुपारी ३ वाजेपर्यंत जाहीर करण्यात येईल असे सांगितले.