रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने १५ मे पासून जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन जाहीर केले होते. १५ मे ते ३१ मे या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले होते. रत्नागिरीमध्ये येणाऱ्या सगळ्या सीमा बंद करण्यात आल्या असल्या तरी काही बेजबाबदार लोक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. वाहतूक पोलीस आणि पोलीसानी अशा लोकांवर कारवाई केली, वाहने जप्त केली, कोरोना टेस्ट केली, ज्यामध्ये काही जण पॉझीटीव्हही सापडले. तरीही अजूनही कित्येकजण पोलिसांना गुंगारा देऊन विनाकारण फिरताना दिसतात.
प्रशासनाने गुरुवार पासून होणाऱ्या ७ दिवसाच्या कडक लॉकडाऊनमुळे रत्नागिरीमध्ये महिन्याच्या जिन्नस खरेदीसाठी झुंबड उडालेली दिसत आहे. बाजारपेठेमध्ये वाहन आणि माणसांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने, सोशल डिस्टांसिंगचा फज्जा उडालेला दिसला. जनतेमध्ये अजूनही या ७ दिवसांच्या लॉकडाऊन मुळे संभ्रम अवस्था झालेली दिसत आहे. कडक लॉकडाऊनमध्ये नक्की काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार याबद्दल द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे. तरीसुद्धा घरामध्ये आठवडाभर लागणारा भाजीपाला, फळे, किंवा इतर जीवनावश्यक वस्तूची बेगमी करण्यासाठी बाजारपेठ मात्र फुल्ल झालेली दिसली.
रत्नागिरीसह, चिपळूण, मंडणगड अनेक तालुक्यामध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती. लोक मोठ्या प्रमाणात घरच्या दैनंदिन गरजेच्या वास्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडलीत. त्यामुळे अशी अचानक आणि सरकारी भाषेतील कडक लॉकडाऊन मुळे सुद्धा कोरोना अधिक वेगाने फैलावू शकतो. अशी होणारी गर्दी कोरोना सुपर स्प्रेडर ठरू शकते. त्यामुळे इतर दिवशी संयम राखून घरी राहिलेली मंडळीना घरगुती खरेदीसाठी घराबाहेर जाणे क्रमप्राप्तचं आहे.