रत्नागिरी पालिका प्रशासनाने नागरिकांना देण्यात येणाऱे दाखले व उताऱ्यांसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कामध्ये दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने केलेल्या ठरावानुसार उतारा, दाखल्यांचे नवे दर असे, असेसमेंट उतारा २०० रुपये, असेसमेंट नाव दाखल व दुरुस्त करणे ७५० रुपये, व्यावसायिकसाठी दाखला २००० रुपये, वसुली विभागाकडून देण्यात येणारे सर्व दाखले २०० रुपये प्रत्येकी. भूखंड नसल्याबाबत दाखला २०० रुपये सर्व्हेक्षण उतारा २० रुपये प्रती प्रत अशी आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार असून त्यामुळे नव्या दरवाढीवरुन पुन्हा गदारोळ होण्याची शक्यता आहे. त्यावर नागरिकांकडून हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्या प्राप्त झालेल्या हरकतींवर २२ डिसेंबरला सुनावणी घेण्यात आली.
सध्या शासकीय राजवट असलेल्या रत्नागिरी पालिका प्रशासनाने आवश्यक दाखले व उताऱ्यासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने दाखले, उतारे शुल्क वाढून त्याचा नाहक बुर्दंड सामान्य नागरिकांना बसणार आहे. त्यापेक्षा पालिकेने कर वसुलीवर जास्त भर देण्याची गरज आहे. दाखले, उतारे शुल्क वाढविण्यापेक्षा कर वसुली व खर्चाचे नियोजन केले तर ते जास्त योग्य होईल, असा सल्ला रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते अमेय परुळेकर यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.
नव्या दरवाढीची सूचना प्रसिद्ध झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अमेय परुळेकर यांच्यासह माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, नीलेश भोसले, विजय जैन आदी अनेक नागरिकांनी हरकती नोंदवल्या. सर्वांनी याला कडाडून विरोध केला आहे. पालिकेने पाणी गळती कमी करावी, उशिरापर्यंत सुरू राहणारी स्ट्रीट लाईट वेळेत बंद होईल याचे नियोजन करावे, थकलेल्या कर वसूलीवर भर द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्याधिकाऱ्यांसमोर दाखले, उतारे शुल्क वाढी बद्दलच्या हरकतींवर सुनावणी झाली. त्यावेळेला अमेय परुळेकर म्हणाले, दाखले, उतारे शुल्क वाढून सामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडणार आहे. पालिकेने जास्तीत जास्त कर वसुली करणे आवश्यक आहे.