रत्नागिरीमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून साकारलेले ऑपरेशन नेत्रा प्रकल्पांतर्गत पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या २२ गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती, व्यापारी यांना आवाहन केले व त्याचे महत्त्व पटवून दिल्यामुळे लोकसहभागातून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लोकसहभागातून १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यात पावस बसस्थानक परिसर, पावस बाजारपेठ, गावखडी, गोळप, कोळंबे, पूर्णगड, चांदोर, लांजा रोड, गणेशगुळे, मेर्वी, पावस, नाखरेरोड, पावस-रत्नागिरी रोड या ठिकाणी १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे २२ गावांची सुरक्षा वाढण्यात मदत मिळत आहे.
पोलिसांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, पावस परिसरातील प्रमुख ठिकाणी लोकसहभागातून बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे भविष्यात होणाऱ्या चोऱ्या व गुन्हेगारी रोखण्यास आणि शोधण्यास चांगली मदत होणार आहे. गुन्हेगारांना वाईट कृत्य करताना विचार करावा लागणार आहे.
परिसरातील रहदारीच्या आणि महत्वाच्या ठिकाणी कॅमेऱ्याची नजर पोहोचत असल्याने आपोआपच प्रत्येकाच्या मनात गुन्हे करताना धाक राहणार आहे. जी गावे अजून या यंत्रणेखाली नाहीत, त्या उर्वरित गावांमध्ये येत्या काही दिवसातच कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, पूर्णगड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय जाधव, गोपनीय अवधूत सुर्वे व बीट अंमलदार यांचे या कार्यामध्ये विशेष योगदान लाभले आहे. या संदर्भात जाधव म्हणाले, कॅमेर्यांच्या माध्यमातून परिसरातील प्रमुख ठिकाणावरून गुन्हेगारी प्रवृत्ती व चोरी रोखण्यास आणि घडलीच एखादी अशी घटना तर या संदर्भातील गोष्टी हेरण्यास आणि गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यास उपयुक्त ठरणार आहेत.