रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने कोरोना संक्रमणाला आळा बसण्यासाठी आखून दिलेल्या कडक लॉकडाऊनला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहेत. व्यापारी वर्गाची मागणी लक्षात घेऊन संपूर्ण आणि कडक लॉकडाऊन केल्याने संयमी रत्नागिरीकरांनी प्रशासनाला साथ दिली आहे. रत्नागिरी मध्ये संचारबंदी १००% यशस्वी झालेली पाहायला मिळत आहे.
पोलीस यंत्रणा चांगलीच सक्रीय झाली असल्याने आणि त्यामध्ये ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने संपूर्ण रत्नागिरीवर लक्ष ठेवणे शक्य झाले असल्याचे जिल्हा पोलीस निरीक्षक डॉ.मोहित कुमार गर्ग यांनी सांगितले आहे. रत्नागिरीमध्ये कडक लॉकडाऊन केले असताना सुद्धा काही जण आपला बेजाबाबदारपणा सिद्ध करण्यासाठी पोलिसांची नजर चुकवून फिरताना दिसतात, पण आत्ता ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने अशा विनाकारण हिंडणाऱ्यावर पोलिसांचा स्पेशल वॉच राहणार आहे आणि वेळीच योग्य ती कारवाई सुद्धा केली जाणार आहे.
कालपासून पोलीस यंत्रणेच्या मदतीला ड्रोन कॅमेरा सज्ज झाला आहे. कंट्रोल रूम किंवा कोणत्याही एका जागी थांबून असे कोणी फिरताना आढळले तर त्वरित त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी पाठवून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. मध्यंतरी पोलिसांनी असे लपून छपून फिरणाऱ्याचे प्रकार जास्त वाढल्याचे लक्षात आल्यानंतर नाकाबंदी विविध ठिकाणी वाढवली, ज्या छुप्या ठिकाणांची माहिती समजली त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा कार्यरत केली. त्यामुळे याची कल्पना नसलेले अनेक जण पोलिसांच्या तावडीत सापडलेत.
कडक लॉकडाऊनच्या काळामध्ये कालपासून मात्र अत्यावश्यक सेवा वगळता, इतर कोणीही रत्नागिरीकर विनाकारण बाहेर फिरताना पोलिसांच्या नजरेस पडले नसल्याची माहिती डॉ. गर्ग यांनी दिली.