रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा आंबेत पूल दोन वर्ष डागडुजीसाठी बंद ठेवण्यात आला होता. अखेर दोन दोन वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याचे संकेत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पुलाच्या केलेल्या पाहणी दरम्यान दिले.
रायगड जिल्ह्यातून खेड, दापोली आणि मंडणगड या तीन तालुक्यांना जोडणारा मुख्य आंबेत पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. या दरम्यान वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याने त्या मार्गावरील एस.टी बसेस बंद असल्याने नागरिक, विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली. पर्यायी जलमार्गाने सुरु करण्यात आलेली रो-रो सेवा सर्वसामान्यांना परवडणारी नव्हती.
रविवारी रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पुलाचे उद्घाटन केले. रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांना जवळच्या मार्गाने जोडणारा आंबेत पूल अखेर वर्षभरानंतर वाहतुकीसाठी खुला झाला असल्याचे जाहीर केले. तसेच नवीन पुलाचा प्रस्ताव लवकरच मंजूर होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. रविवारपासून पूलावरील वाहतूक सुरू करण्यात आल्याने विशेष करून स्थानिकांची आणि विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली आहे.
सावित्री नदीवरील आंबेत या ठिकाणी नवा पूल बांधावा, ही मागणी स्थानिकांनी केली होती. तसा प्रस्ताव संबंधित विभागाकडून राज्य सरकारकडे पाठवला गेला आहे. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी फीत कापून पूल वाहतुकीसाठी खुला केला. लोकार्पण कामाच्या वेळी रायगड पालकमंत्री यांनी दुरुस्तीच्या कामासाठी १२ कोटींचा निधी खर्च झाल्याचे सांगितले. तसेच लवकरच नवीन पुलाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळून तेथे येत्या वर्षांत पूल उभा राहील असे सांगितले.