रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेले काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील चार दिवस अजून पावसाचा जोर कायम राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. जोरदार पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवरून नद्या नाले वाहू लागले आहेत.
राजापूरमधील अर्जुना नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने सायंकाळी बाजारपेठेमध्ये पाणी शिरू लागलेले. बाजारपेठे मध्ये पाणी शिरणे हे दरवर्षीचेच झालेले आहे. त्यामुळे व्यावसायिक आधीपासूनच सतर्क राहिलेले होते. अर्जुना नदीसह वाशिष्ठी, नारिंगी, काजळी, बावनदी,जगबुडी अशा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये अधिक प्रमाणात वाढ झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात मागील २४ तासांमध्ये सरारी ७७.४७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. रत्नागिरी शहरी भागामध्ये पावसाचे प्रमाण वाढल्याने बाजारपेठेमधील घरांमध्ये मध्यरात्री पाणी शिरू लागले होते. त्यामूळे नागरिकांनी रात्र जागून काढल्या. संगमेश्वर तालुक्यात मौजे आरवली शिंदेवाडी येथे दरड कोसळून रस्त्यावर आल्याने वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला होता. रत्नागिरी तालुक्यात मौजे निवळी घाट येथेसुद्धा रस्त्यावर दरड कोसळून रस्ता बंद झाल्याने वाहतूक पाली मार्गे वळविण्यात आली आहे. खेड तालुक्यात चौपदरीकरणाच्या अपुर्या कामांमुळे भरणे नाका येथे घरामध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली. गुहागर मध्ये सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पालशेत येथील बाजारपूलाच्या वरून ओसंडून पाणी वाहू लागल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. त्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली. दापोलीमधील मुरुड, आंजर्ले भागामध्ये सगळ्या परिसरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. रस्त्यांवरून नद्या वाहतात तशी अवस्था निर्माण झाली होती.
तालुक्यातील परंगी, चोरद, जगबुडी अनेक लहान मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत होत्या, परंतु मुसळधार पडणाऱ्या पावसाने काही काळ घेतलेल्या विश्रांतीने पाणी ओसरल्याने पूरजन्य स्थिती निर्माण झाली नाही.